अनोखा दिवाळी उत्सव; चिमुकल्यांनी अनुभवली नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:12 AM2018-11-03T11:12:38+5:302018-11-03T11:13:04+5:30
दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व काय? हे मुलांमध्ये रुजविण्यासाठी सेवासदन सक्षम स्कूलमध्ये अनोखा दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चिमुकल्यांच्या कल्पनेत दिवाळी म्हणजे गोडधोड, कपडे आणि फटाके. पण दिवाळी का साजरी करतात, त्या मागची परंपरा काय?, दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व काय? हे मुलांमध्ये रुजविण्यासाठी सेवासदन सक्षम स्कूलमध्ये अनोखा दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.
दिवाळीच्या सुट्ट्या येत्या सोमवारपासून लागणार आहे. मुलांमध्ये सुट्यांचे आणि या आनंदाच्या उत्सवाचे कुतूहल आहे. सेवासदन सक्षम स्कूलच्या मुलांची यंदाची दिवाळी वेगळी राहणार आहे.
कारण शाळेने त्यांच्या मुलांना दिवाळीचे महत्त्व एका वेगळ्या पद्धतीने पटवून दिले आहे. मुलांकडून तयार करण्यात आलेल्या आकाशकंदीलांची आरास, आकर्षक रांगोळ्यांनी सजविलेला शाळेचा परिसर आणि राम, लक्ष्मण, सीता, श्रीकृष्ण, म्हैशासूर, वामन बटूच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले होते. रावणाचा वध करून प्रभू श्री रामाचे अयोध्येत आगमन झाल्यानंतर अयोध्येत घरोघरी दीपमाळा लागतात आणि दीपांच्या या दिवाळी उत्सवाला सुरुवात होते.
वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षकपणे प्रभू श्रीरामाचे आगमन, राज्याभिषेक सोहळा साजरा करून दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली. दिवाळीचा पहिला दिवस वसूबारस यानिमित्त विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागाचे दर्शन घडविले. धनत्रयोदशीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी बाजारपेठेचे चित्र निर्माण केले.
श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून नरकचतुर्थी साजरी केली. लक्ष्मीचे पूजन, बलीप्रतिप्रदेचे महत्त्व वेगवेगळ्या प्रांतात साजरी केलेली जाणारी भाऊबीज आणि तुळशी विवाहाचे महत्त्व अतिशय आकर्षकपणे आणि विविध वेषभूषाकडून पटवून दिले.
मुलांचे हे कौतुक बघण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती. दिवाळीचे महत्त्व आणि ती कशी साजरी करावी, याचा अनुभव बालकांबरोबरच पालकांनाही आला.
एस.एम. जोशी यांच्या संकल्पनेतून ही दिवाळी साजरी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यातून मुलांना आणि पालकांनाही दिवाळीचे महत्त्व, त्यामागणी परंपरा अनुभवायला मिळाली.
- पद्मजा मराठे, प्राचार्य