विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे अनोखे प्रयोग

By admin | Published: July 6, 2016 03:18 AM2016-07-06T03:18:03+5:302016-07-06T03:18:03+5:30

आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. हीच बाब लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपराजधानीतील विविध शाळांकडून अनेक प्रयोग राबविण्यात येत आहेत.

Unique experiments that make students personality | विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे अनोखे प्रयोग

विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे अनोखे प्रयोग

Next

सर्वांगीण विकासावर शाळांचा भर :
अभ्यासाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड

नागपूर : आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. हीच बाब लक्षात ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपराजधानीतील विविध शाळांकडून अनेक प्रयोग राबविण्यात येत आहेत. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर एकत्र आलेल्या नागपुरातील शाळांमधील मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारे अनोखे प्रयोग उलगडले. भिंतीपलीकडचे शिक्षण व शाळांतर्फे राबविण्यात येणारे विविध कल्पक उपक्रम समोर यावेत, यासाठी ‘लोकमत’तर्फे सोमवारी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात शाळांमधून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या सामाजिक संस्कारांचे अनुभव समोर आले. काही शाळा नाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकातील ज्ञान पोहोचवितात, तर काही शाळा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिकलीची जाणीव वाढविण्यावर भर देतात. विशेष म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांचा संवाद वाढीस लागावा, यासाठी बहुतांश ठिकाणी प्रयत्न केले जातात. शाळेतील संस्कारांतून आयुष्यात प्रगतीची शिखरे गाठणारे विद्यार्थी शाळेत आल्यावर अभिमान वाटतो, हे शिक्षकांचे बोल या प्रयोगांची शक्ती सांगून गेले.

नाट्यांमधून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे
केवळ अभ्यासावरच आमच्या शाळेत भर देण्यात येतो असे नाही तर विद्यार्थ्यांना क्रीडा, नाट्य इत्यादींबाबतदेखील मंच उपलब्ध करुन देण्यात येतो. महिन्यातील दोन शनिवार तर इतर अवांतर उपक्रमच चालतात. यात पोहणे, अश्वारोहण, तायक्वांडो इत्यादी बाबी घेण्यात येतात. याशिवाय विद्यार्थ्यांना इतिहासाचे विविध धडे नाट्यांच्या माध्यमातून समजाविण्यात येतात. विविध उत्सवांच्या वेळीदेखील लहानसे नाट्य बसवून त्या उत्सवाचे महत्त्व सांगितल्या जाते. याशिवाय शाळेत पर्यावरण रक्षणाबाबत विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करण्यात येते. ई-लर्निंग, डिजिटल स्कूलची संकल्पना शाळेत रुजविली आहेच. सोबतच अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
- सुजाता पशीने, वरिष्ठ शिक्षिका, आदर्श संस्कार विद्यालय

पारंपरिक संस्कारांची शिदोरी
आजच्या काळात ‘टीनएजर्स’ विद्यार्थ्यांवर पाश्चात्त्यकरणाचा पगडा असल्याचे दिसून येते. आमच्या शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना पारंपरिक संस्कारांची शिदोरी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थी पायरीला नमस्कार करूनच येतात. लहान मुलांमध्ये मिळूनमिसळून राहण्याची भावना वाढीस लागावी यासाठी भातुकलीची संकल्पना राबवतो. याशिवाय विविध विषयांवर गटचर्चा, विज्ञान प्रदर्शन यातून विद्यार्थ्यांचे ज्ञान मजबूत करण्यावर भर असतो. ‘कुटुंब रंगलेय रंगात’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करुन एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवतो. शिवाय हस्ताक्षर सुधारणा, योगासने हे उपक्रमदेखील सुरुच असतात.
-वर्षा अडगावकर, मुख्याध्यापिका, हिंदू ज्ञानपीठ विद्यालय

सामाजिक बांधिलकीचे विद्यार्थ्यांवर संस्कार
आमच्या शाळेत वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्लब घटकांतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या मुलांना घरी शैक्षणिक वातावरण मिळत नाही. परंतु आम्ही त्यांना शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकीचे धडे देतो. केवळ वर्गातच नाही, विद्यार्थी घरी गेल्यानंतरदेखील शिक्षकांना त्यांची काळजी असते. दोन दिवस विद्यार्थी शाळेत आला नाही तर शिक्षक त्याची विचारपूस करायला घरी जातात. किशोरवयातील मुलामुलींच्या विविध समस्या असतात. या वयात विद्यार्थी भरकटणार नाहीत, यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. सोबतच नियमितपणे कथाकथन, गीतगायन स्पर्धा यांच्यातून त्यांची भाषा चांगली कशी होईल याकडे आमचे लक्ष असते.
-मीनल रेवतकर, मुख्याध्यापिका, विवेकानंद विद्यालय

Web Title: Unique experiments that make students personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.