एका वडिलांचे अनोखे दातृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:10 AM2021-08-13T04:10:14+5:302021-08-13T04:10:14+5:30
- अवयवदान सप्ताह सुमेध वाघमारे (फोटो आहे) नागपूर : होळी हा आनंदाचा सण. त्याच दिवशी तो मोटारसायकलवरून खाली पडला. ...
- अवयवदान सप्ताह
सुमेध वाघमारे
(फोटो आहे)
नागपूर : होळी हा आनंदाचा सण. त्याच दिवशी तो मोटारसायकलवरून खाली पडला. डोक्याला जबर मार लागला. त्याला लागलीच इस्पितळात भरती केले. सात दिवस उपचार सुरू होते. मुलगा बरा होईल, या आशेवर आई-वडील होते. परंतु आठव्या दिवशी डॉक्टरांनी ‘ब्रेन डेड’ घोषित केले. आईचा आक्रोश थांबत नव्हता. वडिलांचाही धीर खचला होता. पण आपला मुलगा जिवंत आहे, ही जाणीव त्यांना सातत्याने होत होती. स्वत:ला सावरत एक निर्णय घेतला, आपल्या मुलाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा. या निर्णयाने एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला गेला.
नागपुरात ‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून मिळालेले हे पहिले अवयवदान ठरले. येथूनच खऱ्या अर्थाने ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) सहकार्याने अवयवदानाला सुरुवात झाली, हे विशेष.
एअर डिफेन्स रेजिमेंटचे निवृत्त हवालदार संजयकुमार सिंग असे त्या वडिलांचे नाव. १८ वर्षीय मुलगा अमित हा २७ मार्च २०१३ रोजी होळीच्या दिवशी मित्रांना भेटायला मोटारसायकलने निघाला. मात्र, काही वेळातच तो रस्त्यावर पडून असल्याचा निरोप आला. त्याला लागलीच जवळच्या इस्पितळात आणि नंतर छिंदवाडा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने आणि डोक्याला जबर मार लागल्याने तेथून त्याला नागपुरातील वोक्हार्ट या खासगी इस्पितळात हलविण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेने सर्वच हादरून गेले होते. बेशुद्ध अवस्थेत त्याच्यावर सात दिवस उपचार चालले. परंतु आठव्या दिवशी डॉक्टरांनी मेंदूत रक्तस्राव झाल्याचे सांगून ब्रेन डेड घोषित केले. या धक्क्यातून सावरत वडिलांनी खचून न जाता संयमतेने अवयवदानाचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय अमितच्या आईला सांगतांना त्यांना मनाची खूप तयारी करावी लागली. पण ती माताही समजली. मुलाचे मूत्रपिंड व डोळे दान करण्यास होकार दिला. दुसऱ्याच दिवशी एका २० वर्षीय मुस्लिम मुलीला आणि एका पोलिसाला मूत्रपिंड देण्यात आले, तर इतर दोघांना नेत्रदान करण्यात आले.
- माझा मुलगा जिवंत
जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने माजी सैनिकांच्या मेळाव्यात मोहन फाऊंडेशनच्या सहकार्याने निवृत्त हवालदार संजयकुमार सिंग यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ‘माझा मुलगा अमित आजही अवयवरूपात जिवंत आहे’, असे मत व्यक्त करून त्यांनी अवयवदानाचे आवाहन केले होते. त्यावेळी मोहन फाऊंडेशनचे नागपूरचे संचालक डॉ. रवी वानखेडे उपस्थित होते.