नागपुरात प्रशासकीय यंत्रणेने जोपासली अनोखी संवेदनशीलता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:43 AM2020-04-18T00:43:18+5:302020-04-18T00:45:04+5:30
कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. स्वत:च्या पगारातून यथाशक्ती निधी गोळा करून त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या ७०० किट खरेदी करून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. स्वत:च्या पगारातून यथाशक्ती निधी गोळा करून त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या ७०० किट खरेदी करून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित केल्या.
शासकीय सेवेत असतानाही सामाजिक संवेदना असलेल्या अधिकाऱ्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत मदतीचा हात देऊन आपली संवेदशीलता जपली आहे. त्यात विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच समाजकल्याण, विक्रीकर आदींचाही समावेश आहे.
‘लॉकडाऊन’च्या संकटकाळात प्रशासकीय कामाची चौकट ओलांडून समाजातील दुर्लक्षित, कष्टकऱ्यांना सुखाचे चार घास मिळावे यासाठी अनेकजण पुढे आले आहेत. समाजातील शेवटच्या घटकातील एकही माणूस उपाशीपोटी झोपता कामा नये यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत असून याला स्वयंसेवी संस्थांकडून चांगला सहयोग मिळत आहे. या संकटकाळात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मदतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना साद घातली. त्याला प्रतिसाद देत महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, तहसीलदार प्रताप वाघमारे तसेच नितीन गोहणे, स्नेहल खवले यांनी सहकारी अधिकाऱ्यांना आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला महसूल नव्हे तर इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. गोळा झालेल्या निधीमधून शासनातर्फे स्वस्त धान्य उपलब्ध होत असताना गरज राहते ती किराणा सामानाची. ती पूर्ण करण्यासाठी तीन डाळी, तेल, तिखट, मीठ, हळद आदी एक ते दीड महिना पुरेल एवढे साहित्य असलेल्या किट ७०० कुटुंबांसाठी तयार करण्यात आल्या. तिचे प्रियदर्शिनी संघटना, समता संघटना, कराडे मित्रमंडळ, सिद्धार्थ मित्रमंडळ आदींच्या साहाय्याने थेट गरीब व गरजूपर्यंत त्या वाटण्यात आल्या. हा उपक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी करण्यात आला, हे विशेष.
महसूल, विक्रीकर, समाजकल्याण, शिक्षण, माहिती आदी विभागातील अधिकाऱ्यांनी स्वत:च्या पगारातून तीन लाख रुपये गोळा केले. मोलमजुरी करणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबाची यादी तयार करण्यात आली. यामध्ये ओंकारनगर, वंजारीनगर, रामटेकेनगर, बेसा आदी भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांचा समावेश आहे.