काँग्रेसची एकी, अन अंतर्गत बेकीमुळे भाजपची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 07:00 AM2020-12-05T07:00:00+5:302020-12-05T07:00:07+5:30

Nagpur news पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जबरदस्त परिवर्तन ही टॅगलाईन घेऊन काँग्रेस मैदानात उतरली. कधी नव्हे ती एकी काँग्रेस नेत्यांमध्ये पहायला मिळाली.

The unity of the Congress, the internal Govt | काँग्रेसची एकी, अन अंतर्गत बेकीमुळे भाजपची गोची

काँग्रेसची एकी, अन अंतर्गत बेकीमुळे भाजपची गोची

Next
ठळक मुद्देगडकरींची छाप प्रचारात दिसली नाही जबरदस्त परिवर्तन घडलेच

कमलेश वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जबरदस्त परिवर्तन ही टॅगलाईन घेऊन काँग्रेस मैदानात उतरली. कधी नव्हे ती एकी काँग्रेस नेत्यांमध्ये पहायला मिळाली. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक असलेले अनिल सोले यांना ऐनवेळी थांबवून महापौर संदीप जोशी यांना दिलेली उमेदवारी भाजपमधील अनेकांच्या पचनी पडली नाही. गेल्यावेळी पदवीधरांवर असलेली गडकरींची छाप यावेळी कुठेच दिसली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती किल्ला लढवला पण पदवीधरांना ते रुचले नाहीत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर चालविलेल्या कॅम्पेनमध्ये काँग्रेसनेही हात धुवून घेतले. शेवटी अभिजित वंजारी यांच्यासारख्या नव्या दमाच्या उमेदवाराला भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात यश आले.

पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल सोले हे गडकरी यांचे खंदे समर्थक असतानाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनामुळे महापौर संदीप जोशी यांना तिकीट मिळाले. मुळात सोले यांचे तिकीट कापून ते जोशी यांना देणे हा बदलच पक्षातील अनेकांना न पचणारा होता. घोषणेनंतर जोशी यांनी गडकरींचे आशीर्वाद घेतले. पण त्यानंतरही गडकरी समर्थक खुल्या मनाने सोबत आले नाहीत. नाराज सोले समर्थकांनी पक्षशिस्तीपोटी उघड नाराजी दाखविली नाही. मात्र, मतपत्रिकेत ती व्यक्त केली. शेवटच्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात तळ ठोकून बसले. बूथपर्यंत जाऊन प्रचार केला. अनेकांच्या उघड तर काहींच्या गुप्त भेटी घेतल्या. पण मतदारांना ते आकर्षित करू शकले नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर कोहळे या दोन आमदारांचे तिकीट कापल्यानंतरही त्या जागी भाजपच निवडून आली. या अनुभवामूळे उमेदवार बदलला तरी भाजपची ‌‘व्होट बँक‘ फुटत नाही, या भ्रमात नेते होते. शेवटी त्यांचा हा भ्रम तुटला आणि भाजपच्या धुरीणांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्व नागपुरात उमेदवारी न मिळताच वंजारी यांनी पक्षनेतृत्वाशी चर्चा करून आपला मोर्चा पदवीधर मतदारसंघाकडे वळविला होता. मायक्रो प्लॅनिंग करीत सहाही जिल्ह्यात स्वत:चे नेटवर्क उभे केले. प्रत्यक्ष मतदार नोंदणीवर भर दिला. काँग्रेसनेही त्यांच्या कामावर विश्वास दाखवत तिकीट दिले. एरव्ही गटातटात विभागलेली काँग्रेस यावेळी एकदिलाने लढली. पहले भाजपसे बचेंगे तभी तो आपसमे लढेंगे, अशी सामंजस्याची भूमिका काँग्रेसचे मंत्री व नेत्यांनी घेतली. बैठका

पक्षसंघटनेसह प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने वंजारी यांच्या पाठिशी उभा राहिला. पदवीधर निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसचे बूथ लागले. त्यामुळे भाजप नेत्याच्या कृपादृष्टीसाठी पडद्यामागे लपणाऱ्या काही नेत्यांना प्रत्यक्ष समोर येऊन काम करावे लागले. महाविकास आघाडी लढत असल्यामुळे राष्ट्रवादीनेही मोलाची साथ दिली तर भाजपवर टपून असलेल्या शिवसेनेनेही प्रचारात जीव ओतला. शेवटी तिघांनी मिळून ‌भाजपची शिकार केली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग गडकरी- फडणवीसांच्या नागपुरात यशस्वी करून दाखवला.

बहुजनवाद जोरात

 पदवीधर ही सुशिक्षितांची निवडणूक समजली जाते. मात्र, या वेळी निवडणुकीत जात व बहुजनवाद जोरात चालला. एरव्ही भाजपची व्होट बँक समजल्या जाणाऱ्या तेली समाजाची एकगठ्ठा मते आपला माणूस म्हणून वंजारी यांच्या पारड्यात पडली. संघाचा उमेदवार विरुद्ध बहुजन असे चित्र निर्माण रंगविण्यात सामाजिक संघटनांना यश आले. याचा भाजपला मोठा फटका बसला. भाजपने हा धोका आधीच ओळखून प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक प्रभारी बनविले होते. तर प्रचाराचा पूर्ण फोकस वर्धेचे खासदार रामदास तडस यांच्यावर केंद्रित केला. मात्र, त्यांनाही मतदारांनी सिरियसली घेतले नाही. ब्रेकनंतर मिळालेल्या पहिल्याच जबाबदारीत बावनकुळे फेल ठरले.

Web Title: The unity of the Congress, the internal Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.