मानवी भावनांची सार्वत्रिकता मांडणारे नाट्य

By admin | Published: October 4, 2015 03:26 AM2015-10-04T03:26:06+5:302015-10-04T03:26:06+5:30

जुन्या काळात असणारी एकत्र कुटुंबपद्धती, गावातील वातावरण आणि शहराची ओढ असणारा तरुण वर्ग. साधारणत:...

Universal drama showing human emotions | मानवी भावनांची सार्वत्रिकता मांडणारे नाट्य

मानवी भावनांची सार्वत्रिकता मांडणारे नाट्य

Next

महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’चा प्रयोग
नागपूर : जुन्या काळात असणारी एकत्र कुटुंबपद्धती, गावातील वातावरण आणि शहराची ओढ असणारा तरुण वर्ग. साधारणत: १९७५ ते ८५ हा काळ अनेक स्थित्यंतरांचा होता. परिस्थिती बदलत होती आणि गावातील वातावरण. जुने लोक जुने सोडायला तयार नव्हते आणि नवी पिढी शहरातील आधुनिक राहणीमानाकडे, नोकरी, पैसा याकडे स्वाभाविकपणे आकर्षित होत होती. पण गावातील शेती, घरातील मोठ्या माणसांचा आदर करण्याची मूल्य, परंपरा पाळताना त्याचा अब्रूशी असणारा तत्कालिक विचार आणि यातूनच प्रत्येकच पिढीत असणारा नव्या-जुन्याचा संघर्ष हे सारेच आपण सातत्याने आजूबाजूला अनुभवत असतो. या सगळ्यांचा संबंध थेट मानवी भावनांशी, त्याच्या स्वार्थाशी आणि आपुलकीशीही आहे. काळ बदलला, प्रश्न बदलले पण मानवी गुंतागुंत वेगवेगळ्या प्रवाहाने सारखीच आहे. मानवी भावनांची हीच सार्वत्रिकता मांडणारे नाट्य म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’.
जिगिषा आणि अष्टविनायक निर्मित या नाटकाचे दोन प्रयोग शनिवारी डॉ. देशपांडे सभागृहात सिद्धीविनायक पब्लिसिटीने आयोजित केले होते. या नाटकाची पार्श्वभूमी विदर्भातील असल्याने वऱ्हाडी भाषा आणि लेखक महेश एलकुंचवार नागपूरचे असल्याने रसिक नाटकाशी अधिक ‘रिलेट’ झाले. खूप अलंकृत संवाद नाही, घटनांची फारशी गुंतागुंत नाही आणि काही वेळेला संथ होणारे नाटक म्हणजे सहजपणे घरात घडणाऱ्या घटना, चर्चा, राग, लोभ या भावना अनुभवताना नकळत रसिकांनाही या साऱ्या घटना त्यांच्याच आयुष्यात घडल्यासारख्या वाटतात, हेच या नाटकाचे यश आहे. नाटक बऱ्याच प्रसंगात संथ होत असले तरी हा संथपणाच या नाटकाचा अवकाशही आहे आणि हा अवकाश अर्थपूर्ण आहे, याची प्रचिती पाहताना येते. मुळात सर्वच कलावंतांनी अगदी सहज केलेला अभिनय, गोळीबंद संहिता आणि संहितेचा विचार करून केलेले दिग्दर्शन यामुळे हे नाटक रसिकांना बांधून ठेवणारे होते. यात निवेदिता जोशी-सराफ, भारती पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, नेहा जोशी, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, विनिता शिंदे, अजिंक्य ननावरे, वैभव मांगले आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आहेत. देहबोली आणि परिणामकारक टायमिंग, सहज होणारी संवादफेक हे या कसलेल्या कलावंतांचे वैशिष्ट्यच होते. २० वर्षानंतर रंगभूमीवर आलेले ‘वाडा चिरेबंदी’ आत्ताच्या पिढीला प्रथमच अनुभवता आले. (प्रतिनिधी)

Web Title: Universal drama showing human emotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.