विद्यापीठ टाकतेय ‘कात’

By admin | Published: May 11, 2015 02:16 AM2015-05-11T02:16:37+5:302015-05-11T02:16:37+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्यापासून येथील विविध पदव्युत्तर...

University campus | विद्यापीठ टाकतेय ‘कात’

विद्यापीठ टाकतेय ‘कात’

Next

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्यापासून येथील विविध पदव्युत्तर विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांमध्ये संशोधनाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ पुस्तकांच्या कक्षेत अडकून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष संशोधनावर विद्यापीठातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बाबतीत कात टाकल्याचेच दिसून येत आहे. विशेषत: ‘इंडिनय सायन्स कॉंग्रेस’मध्ये झेंडा फडकविल्यानंतर विद्यापीठाने संशोधन प्रकल्पांचा मुद्दा गंभीरतेने घेण्याचे ठरविले आहे.
नागपूर विद्यापीठातील विभाग व महाविद्यालयांत संशोधन हवे त्या प्रमाणात होत नाही अशी नेहमी ओरड करण्यात येते. परंतु हे वातावरण बदलावे यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’साठी तयारी करण्यासाठी विद्यापीठाला फारच थोडा वेळ मिळाला होता. प्रथमच यात सहभागी होत असतानादेखील कमी वेळात तयार करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांनी दाद दिली. ही बाब लक्षात घेता राष्ट्रीय पातळीवर संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठाचे नाव अग्रक्रमावर राहावे यासाठी विद्यापीठाकडून धोरण आखण्यात येत आहे.
विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना ‘प्लॅटफॉर्म’ मिळावा यासाठी राज्यस्तरीय ‘आविष्कार’ या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. ‘आविष्कार’साठी निरनिराळ््या महाविद्यालयांतून विद्यापीठाच्या चमूची निवड करण्यात येते. परंतु अनेकदा विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसल्याने त्यांना संधी मिळत नाही असे चित्र आहे.
विदेशातदेखील प्राध्यापकांचा झेंडा
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापकांचे तर देशासोबतच विदेशातदेखील कौतुक होत आहे. अनेक प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी निमंत्रण येत आहेत. शिवाय विविध प्रकल्पांवरदेखील पदव्युत्तर विज्ञान विभागांतील प्राध्यापक काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही बाबी अत्यावश्यक आहे. या दोन्ही क्षेत्रात विद्यापीठातून जास्तीत जास्त संशोधन झाले पाहिजे. यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करेल असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.

Web Title: University campus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.