आजपासून विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठाचीदेखील परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:30+5:302021-03-25T04:08:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६९ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यापीठात प्रथमच ‘वेबबेस्ड’ परीक्षा होणार आहे. उन्हाळी परीक्षा ‘अॅप’च्या माध्यमातून झाल्या होत्या. सुरुवातीला त्यात काही प्रमाणात गोंधळ झाला होता. मात्र त्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडल्या होत्या. संकेतस्थळाच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचा पहिलाच प्रयोग असल्याने विद्यापीठासाठीदेखील ही परीक्षाच मानली जात आहे.
‘कोरोना’मुळे ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार विद्यापीठाने ‘अॅप’ऐवजी ‘वेबबेस्ड’ परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात बीकॉम, बीएस्सी, बीई, बीबीए इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना घरबसल्या संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब्लेटच्या माध्यमातून परीक्षा देता येणार आहे. त्यासंदर्भात विद्यापीठाने संकेतस्थळावर विस्तृत दिशानिर्देश जारी केले आहेत. विद्यार्थ्यांनी त्याचे पालन करावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना एका तासात ४० बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. इंटरनेट कनेक्टीव्हिटी व इतर अडचणी लक्षात घेता, प्रत्येक सत्राला तीन तासाचा वेळ देण्यात आला आहे. त्यादरम्यान विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील.
‘मॉक टेस्ट’साठी विचारणा
मंगळवारी ‘मॉक टेस्ट’बाबत विचारणा होत होती. बुधवारी सकाळी परीक्षेबाबतच्या तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली. ‘मॉक टेस्ट’देखील सुरू झाली. अनेक विद्यार्थ्यांकडून याबाबत विद्यापीठाला विचारणा होत होती. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी माहिती देणारा एक व्हिडीओदेखील तयार करण्यात आला असून, तो त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा
- फ्रंट कॅमेरा किंवा वेबकॅम सुरू असणे अनिवार्य.
- लॅपटॉप, मोबाईल चार्ज पूर्णपणे चार्ज असावे.
- इंटरनेट कनेक्टीव्हिटी अगोदर तपासून घ्यावी.
- परीक्षेसाठी बसण्याच्या जागी योग्य प्रकाश हवा.
- वेबकॅम किंवा फ्रंट कॅमेरा चेहऱ्यावर फोकस असावा.
- एमएस टीम्स, झूम, गुगल मीट यासारखे अॅप्स अगोदर डिलीट करावे.
- परीक्षेदरम्यान कॅलक्युलेटर, लाँग टेबल आणि कोरे कागद वापरता येतील.
कारवाई होऊ नये यासाठी सूचना
- मोबाईल कॅलक्युलेटर वापरू नये.
- परीक्षेदरम्यान कुठलेही बोलणे व हालचाल टाळावी.
- चेहऱ्याला मास्क, केस, हात यांनी झाकू नये.
- मुख्य स्क्रीनपासून दूर जाता येणार नाही.
- एकापेक्षा अधिक उपकरणांवरून लॉगिन करता येणार नाही.
- वेबकॅम, मायक्रोफोन्स किंवा स्क्रीनशेअरचे पर्याय असलेले अॅप्लिकेशन्सना मनाई.
- हेडफोन, ईअरबड्सचा उपयोग करू नये.