एम.एससी.चा पेपर घेण्याचा विद्यापीठाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 10:14 PM2021-07-23T22:14:38+5:302021-07-23T22:15:07+5:30
University forgets to get M.Sc. Exam सबकुछ ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांना वर्ग किंवा परीक्षेचा विसर पडताना दिसून येत आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला चक्क नियोजित वेळेवर विद्यार्थ्यांची परीक्षाच न घेण्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सबकुछ ऑनलाईनमुळे विद्यार्थ्यांना वर्ग किंवा परीक्षेचा विसर पडताना दिसून येत आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला चक्क नियोजित वेळेवर विद्यार्थ्यांची परीक्षाच न घेण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. एम.एससी. च्या (फॉरेन्सिक सायन्स) चौथ्या सत्राचा पेपर वेळेवर सुरू न झाल्याने विद्यार्थी हैराण झाले होते. यासंदर्भात चाचपणी केली असता विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिकाच अपलोड करण्यात आली नव्हती अशी माहिती कळाली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
उन्हाळी परीक्षा सुरू असून एम.एससी. (फॉरेन्सिक सायन्स) च्या चौथ्या सत्राचा शुक्रवारी अखेरचा पेपर होता. विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार फाऊंडेशन कोर्सचा पेपर दुपारी तीन ते सायंकाळी सहा या कालावधीत होणार होता. परंतु पेपर सुरूच झाला नाही. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत विचारणा केली, मात्र शिक्षकांनादेखील नेमका प्रकार कळत नव्हता. दोन तास प्रतीक्षा केल्यानंतर विद्यापीठाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्यात आला व विचारणा करण्यात आली. परंतु विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी बनविण्यात आलेल्या मदत केंद्रातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. सायंकाळी सहा वाजता विद्यार्थ्यांनी लोकमतशी संपर्क केला.
यानंतर परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता त्यांनी तात्काळ चौकशी केली. त्यात विद्यार्थ्यांची तक्रार योग्य असल्याचे समोर आले. त्यांनी तातडीने सूत्रे हलविली व सायंकाळी ६.२५ वाजता विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रश्नपत्रिका अपलोड करण्यात आली.
मदतकेंद्र काय कामाचे ?
विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान मदत मिळावी यासाठी मदतकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र या केंद्राबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. ऐन अडचणीच्या वेळी तेथून मदत मिळत नाही व परीक्षा विभागातील कर्मचारीदेखील योग्य प्रतिसाद देत नाहीत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेल्या केंद्रावर वेळेत सहकार्य का मिळत नाही याचे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेदेखील नाही.