विद्यापीठात होणार महानुभाव पंथाचे अध्यासन

By admin | Published: February 29, 2016 02:53 AM2016-02-29T02:53:54+5:302016-02-29T02:53:54+5:30

महानुभाव पंथाने मराठीला राजभाषेचा व धर्मभाषेचा दर्जा मिळवून दिला. मराठीच्या वाटचालीत महानुभाव पंथाने मोठे योगदान दिले आहे.

University of Great Powers | विद्यापीठात होणार महानुभाव पंथाचे अध्यासन

विद्यापीठात होणार महानुभाव पंथाचे अध्यासन

Next

महानुभाव साहित्य संमेलन : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
नागपूर : महानुभाव पंथाने मराठीला राजभाषेचा व धर्मभाषेचा दर्जा मिळवून दिला. मराठीच्या वाटचालीत महानुभाव पंथाने मोठे योगदान दिले आहे. महानुभाव पंथाचे हे विचार व साहित्याच्या अभ्यास व संशोधनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चक्रधरस्वामी यांच्या नावाने महानुभाव पंथाचे अध्यासन सुरू करण्यात येईल. तसेच त्याला राज्य शासनाच्यावतीने आर्थिक पाठबळ सुद्धा उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
महानुभाव सेवा संघ नागपूरद्वारा सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात महानुभाव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्यश्री गोविंदराज व्यास कारंजेकरबाबा हे संमेलनाध्यक्ष होते. नागराजबाबा शास्त्री हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, रायकरबाबा, सुभद्राआत्या शास्त्री कपाटे, माहूरकरबाबा शास्त्री हे विशेष अतिथी होते. युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे, आनंदराव गजभिये, चंद्रशेखर गायकवाड, पुरुषोत्तम ठाकरे, अविनाश ठाकरे, परिणय फुके व्यासपीठावर होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १२ व्या शतकात जेव्हा सामाजिक विषमतेने परिसीमा गाठली होती तेव्हा समाज समता व बंधुत्व विसरू लागला होता. तेव्हा महानुभाव पंथाने पहिल्यांदा समतेचे बीजारोपण केलं. भेदाभेद, विषमता दूर झाली पाहिजे, समाजात समता निर्माण झाली पाहिजे, असा प्रयत्न केला. मराठ्यांचे राज्य हे अटकेपार गेले. परंतू मराठीला पहिल्यांदा अटकेपार कंदहारपर्यंत नेण्याचे कार्य महानुभाव पंथाने केले.
महानुभाव पंथाची खरी विचारभूमी ही रिद्धपूर राहिली आहे. रिद्धपूरचा विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. रिद्धपूरचा विकास केला जाईल. तेथे यात्री निवासाचे काम लवकरच सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, धर्म हा केवळ ईश्वर भक्तीचा मार्ग नसून संपूर्ण मानवी जीवनाला प्रकाशमान करणारी दुर्दम्य अशी प्रेरणा आहे. स्वामींचा विचार हा लोकशाही मूल्यांवर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले. कुलगुरु डॉ. काणे यांनी महानुभावपंथाने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केल्याचे सांगितले. याप्रसंगी नागराजबाबा शास्त्री, रायकरबाबा, सुभद्राआत्या शास्त्री कपाटे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महानुभाव साहित्य संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन आणि ग्लोबल महानुभाव संघ या अ‍ॅन्ड्राईड अ‍ॅप्लीकेशनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी संचालन केले. अ‍ॅड. के. आर. शेंडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

लीळाचरित्राचा वाद कायमचा सोडवावा
महानुभाव सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. तु.वि. गेडाम यांनी महानुभाव पंथीयांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा विषद केल्या. ‘लीळाचरित्र’ या ग्रंथाचा मुद्दा उपस्थित करीत ते म्हणाले, याबाबत न्यायालयात प्रकरण सुरू आहे. या ग्रंथाची तिसरी प्रत छापून तयार आहे. परंतु त्याचे प्रकाशन करता येत नाही. काही लीळाबाबत वाद आहेत. त्या खरच वादग्रस्त आहेत की नाही,. यासाठी शासनाने तीन सदस्यीय समिती नेमावी आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करून या विषयाचा एकदा सोक्षमोक्ष लावावा. तसेच चक्रधर स्वामी यांच्या जयंतीच्या दिवशी ऐच्छिक सुटी जाहीर करावी, रिद्धपूरचा विकास करावा, तेथे नवीन यात्री निवास बांधावे, चंद्रपूर जिल्ह्यातील चिचोली या गावाला पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करावे आणि विद्यापीठात चक्रधरस्वामींच्या नावाने अध्यासन सुरू करावे, अशा मागण्याही केल्या. यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लीळाचरित्र ग्रंथाबाबत सध्या न्यायालयात वाद सुरू आहे, इतकीच आपल्याला माहिती आहे. त्यासंदर्भात आपल्याकडून संपूर्ण माहिती घेऊन ती समजून त्यातून निश्चित मार्ग काढला जाईल. काही वाद असतील तर ते वगळून ग्रंथ प्रकाशित करण्याबाबतची सूचना चांगली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महानुभावाचे साहित्य व दर्शनप्रकाराची गंगोत्री म्हणजे लीळाचरित्रच - आचार्यश्री कारंजेकरबाबा
महानुभावांचे जे हजारो साहित्यप्रकार व दर्शनप्रकार जन्माला आले असतील त्यांची गंगोत्री लीळाचरित्रच आहे, असे संमेलनाध्यक्ष आचार्यश्री गोविंदराजव्यास कारंजेकरबाबा यांनी सांगितले. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, धर्मशास्त्र अशा कित्येक विषयांच्या अभ्यासकांचा लीळाचरित्र हा कंठमणी आहे. इ.स. १२७८ मध्ये श्रीम्हार्इंभट्टांनी लिहिलेला हा ग्रंथ मराठीतील पहिला ग्रंथ आहे, हे आपण अभिमानाने सांगायलाच हवे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धधर्माचा स्वीकार करण्याआधी समता आणि बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या महानुभवपंथाचा स्वीकार करण्याविषयी सखोल विचार केला होता, याला अलिकडचा इतिहास साक्षी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Web Title: University of Great Powers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.