विद्यापीठात कौशल्य विकास संस्था उभारा

By admin | Published: January 12, 2016 02:53 AM2016-01-12T02:53:55+5:302016-01-12T02:53:55+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या युवा धोरणाच्या मसुद्यामध्ये विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे.

The University has developed a skill development institute | विद्यापीठात कौशल्य विकास संस्था उभारा

विद्यापीठात कौशल्य विकास संस्था उभारा

Next

युवा धोरण समितीची शिफारस : मसुदा अहवालात कौशल्य विकासावर भर
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या युवा धोरणाच्या मसुद्यामध्ये विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच त्यांना तंत्रशिक्षण कौशल्यांचेदेखील प्रशिक्षण मिळावे यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कौशल्य विकास संस्था स्थापन करण्यात यावी व राष्ट्रीय ज्ञान आयोगाकडून संलग्नता मिळवावी, अशी शिफारस युवा धोरण समितीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, युवा धोरणाचा मसुदा मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठातून कुशल मनुष्यबळ बाहेर पडावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशातून डिसेंबर २०१४ मध्ये विद्यापीठाचे युवा धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला व डॉ. संजय खडक्कार यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली. या समितीने विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी आणि विद्यापीठेतर युवकांच्या समकालीन संदर्भातील गरजा लक्षात घेऊन अभ्यास केला व धोरणाचा अंतिम मसुदा तयार केला. या मसुद्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरणदेखील करण्यात आले.
या धोरणाच्या मसुद्यात १४ बाबींच्या अंतर्गत विविध शिफारशी करण्यात आल्या आहेत. यात भर आहे तो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्यामधील रोजगारक्षमता वाढावी यावर. विद्यापीठात विविध कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू व्हावेत व विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. तसेच प्रशिक्षित विद्यार्थ्यांचा ‘डेटा बेस’ तयार करून तो जिल्हा प्रशासनाला पुरविण्यात यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.
मंजुरीसाठी प्रतीक्षाच
विद्यापीठात कौशल्य विकास संस्था उभारा

नागपूर : नागपूर विद्यापीठाने राज्यपालांना या धोरणाचा मसुदा पाठविला होता. या मसुद्यातील शिफारशींवर मत विचारात घेण्यासाठी राज्यपालांनी हा मसुदा उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविला आहे. जर तेथून सकारात्मक उत्तर आले तर लगेच या धोरणाला मंजुरी देण्यात येईल. सोबतच मुख्यमंत्रीदेखील या मसुद्याचा अभ्यास करणार आहेत. राज्याच्या युवा धोरणातील सारख्या शिफारशी कुठल्या हे यातून ठरविण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. एकूणच या धोरणाला मंजुरी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम हवेत
नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांमध्ये उपलब्ध नैसर्गिक संपत्ती, पिके व रोजगाराच्या एकूण संधी लक्षात घेऊन जिल्हावार लाभ देणारे अभ्यासक्रम तयार करण्यात यावेत, अशी महत्त्वाची शिफारस या समितीने केली आहे. वंचित कुटुंबातील युवक, महिला यांच्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये माध्यम साक्षरता, संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र व व्यवस्थापन कौशल्य यांचा विकास व्हावा यासाठी पुढाकार घेण्याची शिफारस समितीने केली आहे.
अंमलबजावणीचे आव्हान
युवा धोरण स्वीकृत झाल्यानंतर याच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान विद्यापीठासमोर राहणार आहे. विद्यापीठांमधील अनेक विभाग व महाविद्यालयांमध्ये अगोदरच पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. त्यामुळे धोरणातील शिफारशींची अंमलबजावणी किती प्रमाणात होणार हा प्रश्नच आहे. शिवाय विद्यापीठाला या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार यंत्रणा तयार करणे, आर्थिक तरतूद करणे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे या बाबींवर लक्ष द्यावे लागणार आहे. शिवाय धोरण मूल्यमापन समितीदेखील नेमावी लागणार आहे. धोरणात समाविष्ट असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीचा आढावा वर्षातून एकदा तर संपूर्ण धोरणाचा आढावा तीन वर्षातून एकदा घेण्यात यावा, असे या धोरण समितीने सुचविले आहे.

Web Title: The University has developed a skill development institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.