विद्यापीठ कायद्याला महाविद्यालयांकडून हरताळ :विद्यार्थी विकास कक्षच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 08:07 PM2019-06-24T20:07:49+5:302019-06-24T20:08:23+5:30
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू होऊन सुमारे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत अद्यापही तरतुदीनुसार विद्यार्थी विकास कक्षांची स्थापना झालेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे नागपूर विद्यापीठाकडूनदेखील यासंदर्भात फारसा पुढाकार घेण्यात आलेला नसून अंमलबजावणी झाली की नाही याची चाचपणी करण्याची यंत्रणादेखील अस्तित्वात नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा लागू होऊन सुमारे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत अद्यापही तरतुदीनुसार विद्यार्थी विकास कक्षांची स्थापना झालेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे नागपूर विद्यापीठाकडूनदेखील यासंदर्भात फारसा पुढाकार घेण्यात आलेला नसून अंमलबजावणी झाली की नाही याची चाचपणी करण्याची यंत्रणादेखील अस्तित्वात नाही. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३० एप्रिल २०१९ या कालावधीत किती महाविद्यालयांत विद्यार्थी विकास कक्ष स्थापन करण्यात आला, किती महाविद्यालयांवर कारवाई झाली किंवा नोटीस बजावण्यात आली हे प्रश्न त्यांनी विचारले होते. नवीन विद्यापीठ कायद्यासंदर्भात ११ जानेवारी २०१७ रोजी राजपत्र प्रकाशित झाले होते व तत्काळ हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यातील कलम ५६ (२) नुसार विद्यापीठ व प्रत्येक संलग्नित महाविद्यालयात विद्यार्थी विकास कक्ष असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात येणाऱ्या विविध समस्या, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास इत्यादीकडे या कक्षाच्या माध्यमातून लक्ष देणे अपेक्षित आहे. प्रत्येक महाविद्यालयातील कक्षांचे नेतृत्व उपप्राचार्यांकडे राहील. सोबतच प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेले शिक्षक, महिला शिक्षक, समाजसेवक, समुपदेशक यांचा समावेश अशी कायद्यात तरतूद आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार विद्यापीठातील एकाही महाविद्यालयात विद्यार्थी विकास कक्ष स्थापन झालेला नाही. सर्व ठिकाणी हा कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. दोन शैक्षणिक सत्र उलटून गेल्यानंतरदेखील विद्यार्थी विकास कक्ष स्थापन न होऊ शकण्याची कारणे काय याची कुठलीही विचारणा विद्यापीठाने केलेली नाही. एकाही महाविद्यालयावर कारवाईदेखील झालेली नाही. यामुळे विद्यापीठाच्या प्रणालीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.