विद्यापीठाने उगारले ‘तक्रारास्त्र’
By admin | Published: September 3, 2015 02:30 AM2015-09-03T02:30:45+5:302015-09-03T02:30:45+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांवरून निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत प्रशासनाने एकदम कडक भूमिका घेतली आहे.
महेंद्र निंबार्ते विरोधात पोलीस तक्रार : बदनामी केल्याचा आरोप
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्यांवरून निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत प्रशासनाने एकदम कडक भूमिका घेतली आहे. विद्यापीठाच्या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य महेंद्र निंबार्ते यांच्याविरोधात विद्यापीठाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. निंबार्ते यांनी ‘सोशल मीडिया’वरून जाणुनबुजून विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप विद्यापीठाने लावला आहे. विद्यापीठाने प्राधिकरणांतील एखाद्या माजी सदस्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.नागपूर विद्यापीठाचा १०२ वा दीक्षांत समारंभ पार पडल्यानंतर ‘पीएच.डी.’ पदवीधारकांना लगेच पदवी देण्यात आल्या. या पदवीवर ‘युनिव्हर्सिटी’ ऐवजी ‘युनिबर्सिटी’ असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची तक्रार काही उमेदवारांनी केली.
त्यामुळे विद्यापीठाने चुकीच्या पदव्या छापल्या की काय असा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु संबंधित मुद्दा हा ‘फॉन्ट’मुळे निर्माण झाला असून यात चुकीचे काहीही नाही असे ‘लोकमत’ने सर्वात अगोदर प्रकाशित केले होते. परंतु महेंद्र निंबार्ते यांनी जाणूनबुजून ‘सोशल मीडिया’वर विद्यापीठाची बदनामी केली व चुकीच्या माहितीचा प्रसार केला. यातून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप विद्यापीठाने लावला. विद्यापीठाची बदनामी केल्याबाबत प्रशासनाने त्यांच्याविरोधात बुधवारी सायंकाळी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली.(प्रतिनिधी)
पदवी परत घेण्याचा प्रश्नच येत नाही
विद्यापीठाच्या पदवीमध्ये ‘लिन्कन’ हा ‘फॉन्ट’ वापरण्यात आला आहे. हा ‘फॉन्ट’ जगातील अनेक विद्यापीठांत वापरण्यात येतो. या ‘फॉन्ट’नुसार ‘युनिव्हर्सिटी’चे ‘स्पेलिंग’ चुकलेले नाही. त्यामुळे पदवी परत घेण्याचा प्रश्नच नाही. विद्यार्थ्यांनी चिंता करू नये असे आवाहन डॉ.येवले यांनी केले.
विद्यापीठात आंधळे सरकार
विद्यार्थ्यांच्या पदवीमध्ये ‘युनिव्हर्सिटी’ऐवजी ‘युनिबर्सिटी’ असे स्पष्ट दिसत आहे. याअगोदरदेखील ‘लिन्कन’ हा ‘फॉन्ट’वापरण्यात येत होता असा दावा विद्यापीठाने केला आहे. मग अगोदरच्या पदव्यांमध्ये असे का झाले नाही? याअगोदर खोटी लिपी वापरत होते का असा प्रश्न महेंद्र निंबार्ते यांनी उपस्थित केला आहे. एखादी बाब विद्यापीठाच्या लक्षात आणून देणे हा गुन्हा नाही. मुळात विद्यापीठातील अनेक गैरप्रकारांना मी समोर आणले. कुलसचिवांकडील दोन पदांचा कारभार, परीक्षा नियंत्रकांचे अपयश या बाबींवर आवाज उचलला. याला दाबण्यासाठी विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. विद्यापीठात एककल्ली कारभाराला सुरुवात झाली असून आंधळे सरकार आले आहे. विद्यापीठातील सर्वोच्च अधिकाऱ्यांनी डोळे उघडून काम करावे असे सांगतानाच आणखी गैरप्रकार समोर आणू असा दावा निंबार्ते यांनी केला.
पहिले तक्रार दाखल करा
प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ.हिरेखण हे नवे परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याकडे बुधवारी सकाळीच पदभार सोपविणार होते. परंतु या प्रकरणात पहिले पोलीस तक्रार दाखल करा आणि मगच जबाबदारीतून मुक्त व्हा, अशी अटच प्रशासनाकडून त्यांना टाकण्यात आली होती. त्यामुळे सायंकाळी तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी डॉ.खटी यांच्याकडे पदभार सोपविला.