विद्यापीठात ‘मोर्चे’कारण!
By admin | Published: August 13, 2015 03:31 AM2015-08-13T03:31:58+5:302015-08-13T03:31:58+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर सलग दुसऱ्या दिवशी पाच विद्यार्थी संघटनांनी धडक दिली.
संघटनांचा हल्लाबोल, अधिकारी हैराण :
सलग दुसऱ्या दिवशी पाच संघटनांची धडक
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर सलग दुसऱ्या दिवशी पाच विद्यार्थी संघटनांनी धडक दिली. संघटनांच्या मागण्या वेगवेगळ्या असल्या तरी त्यांना सामोरे जाताना अधिकारी अक्षरश: हैराण झाले. सलग दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या प्रशासकीय कामावर यामुळे परिणाम झाला.
बुधवारच्या मोर्चांची सुरुवात सकाळीच झाली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आम आदमी पक्षाची छात्र युवा संघर्ष समिती, भारतीय जनता युवा मोर्चा व मोखारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गटाने एकापाठोपाठ एक विद्यापीठात धडक दिली. रखडलेले निकाल, बीकॉम-बीए या अभ्यासक्रमांचे कमी लागलेले निकाल, परीक्षा शुल्काची जास्त रक्कम, पुनर्मूल्यांकनाचे प्रलंबित निकाल इत्यादी मुद्यांवरुन या संघटनांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा वर्षाव केला. या मोर्चांना सामोरे जाण्यातच वेळ गेल्याने कुलगुरूंना एकाही बैठकीचा जाता आले नाही. दरम्यान, विद्यार्थी आक्रमक होऊन कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.(प्रतिनिधी)
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची ओरड
बीकॉमचा निकाल हा गेल्या ५ वर्षांपासून १८ ते २३ टक्के यादरम्यानच लागत आहे. यंदा सुमारे १८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. काही खासगी शिकवणीवर्ग चालकांनी व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना तुमच्यावर अन्याय झाला आहे असे सांगून विद्यापीठाकडे पाठविले. मुळात विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. परंतु चुकीच्या सल्ल्यांमुळे ते विद्यापीठात येऊन आपला वेळ वाया घालवत आहेत, अशी प्रतिक्रिया विद्यापीठातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.
कुलगुरूंसमोर ठेवली भिक मागून जमविलेली रक्कम
छात्र युवा संघर्ष समितीचे कार्यकर्ते सलग तिसऱ्या दिवशी विद्यापीठात पोहोचले. यावेळी सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. अखेर काही प्रतिनिधींना कुलगुरूंच्या कक्षात जाण्याची परवानगी देण्यात आली. परीक्षा शुल्काच्या विरोधात या कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकात ‘भिक मांगो’ आंदोलन करुन पैसे जमा केले होते. हे पैसे या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना देण्याचा प्रयत्न केला. कुलगुरूंनी ते पैसे घेण्यास नकार दिला असता त्यांच्या टेबलवर पैशांची थैली ठेवण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली. संघटनेचा हा प्रकार अशोभनीय असल्याची टीका विद्यापीठ वर्तुळातून होत होती.