नागपूर विद्यापीठ : ‘ब्लेझर’, ‘ट्रॅक सूट’ नियमबाह्य खरेदी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:24 AM2018-09-17T10:24:28+5:302018-09-17T10:24:59+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाद्वारे करण्यात आलेली ‘ब्लेझर’, ‘ट्रॅक सूट’ व ‘कीट’ची खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
आशिष दुबे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाद्वारे करण्यात आलेली ‘ब्लेझर’, ‘ट्रॅक सूट’ व ‘कीट’ची खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विभागाने नियमांचे पालन न करता कुलपती व इतर समितीची आवश्यक परवानगी न घेता सामानाची खरेदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात विभागाच्या संचालक डॉ.कल्पना जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
विविध आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यापीठाची महिला व पुरुष चमू रवाना झाली आहे. पथकातील सदस्यांसाठी ‘ब्लेझर’, ‘ट्रॅक सूट’ व ‘कीट’ची खरेदी करण्यात आली. मात्र यासाठी कुलगुरू किंवा समितीची परवानगी घेण्यात आली नाही. विभागाने लाखोंची खरेदी केली आहे. विभाग संचालक डॉ.कल्पना जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण साहित्य ५ लाख १० हजार रुपयांचे होते. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ पथकातील सदस्यांच्या ‘ब्लेझर’ची किंमतच ५ लाख १० हजार रुपये पडली. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा खुलासा काही दिवसांअगोदर झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीत झाला. या मुद्याला गंभीरतेने घेत समितीने खरेदीला मंजुरी देण्यास नकार दिला. तसेच विभाग संचालकांकडून स्पष्टीकरण मागितले. डॉ.जाधव यांचे स्पष्टीकरण आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. वित्त व लेखा अधिकारी कार्यालयाला या व्यवहारांची माहिती कशी कळली नाही, हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. या प्रकरणावर कुणीही बोलण्यास तयार नाही. वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांना संपर्क केला असता त्यांनीदेखील माहिती देण्यास नकार दिला. पुढील बैठकीत स्थिती स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. तर विभाग संचालक डॉ.कल्पना जाधव यांनी खरेदीत कुठलीही गडबड झाली नसल्याचा दावा केला. बैठकीत मंजुरीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे दिली नव्हती. त्यामुळे समितीने दस्तावेज मागितले आहेत, असे त्यांचे म्हणणे मांडले. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.
असे आहेत नियम
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागांना तीन लाखांपर्यंतची खरेदी करण्याचा अधिकार असतो. याहून अधिक रकमेची खरेदी करण्याच्या अगोदर निविदा प्रक्रिया राबवावी लागले. निविदा बोलविल्यानंतर सामान खरेदीवर कुलगुरूंची परवानगी घेणेदेखील अनिवार्य असते. मात्र शारीरिक शिक्षण विभागाद्वारे असे काहीच करण्यात आले नाही. मंजुरी न घेताच एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आले. सामान विभागाला पोहोचविण्यातदेखील आले. देयकाला मंजुरी देण्यासाठी समितीसमोर ठेवण्यात आले. त्यावेळी उपस्थित सदस्यांनी यावर हरकत घेतली. त्यानंतर विभाग संचालकांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले.