नागपूर विद्यापीठ ; अखेर हिदायतुल्लाह झाले ‘उपराष्ट्रपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:13 AM2019-07-09T10:13:08+5:302019-07-09T10:13:36+5:30
देशाचे सहावे उपराष्ट्रपती व जगभरात कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखल्या गेलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह यांच्यासंदर्भात झालेली मोठी चूक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर सुधारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे सहावे उपराष्ट्रपती व जगभरात कायदेतज्ज्ञ म्हणून ओळखल्या गेलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्लाह यांच्यासंदर्भात झालेली मोठी चूक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर सुधारली आहे. नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपराष्ट्रपतीऐवजी त्यांना देशाचे ‘उपाध्यक्ष’ असे पद नमूद होते. या जावईशोधावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला होता.
नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देशविदेशात आपल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष उल्लेख आहे. संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीमध्ये न्या.मोहम्मद हिदायतुल्लाह यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी मंत्री डॉ.श्रीकांत जिचकार, जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी, जागतिक कीर्तीचे संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर इत्यादींचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र हिदायतुल्लाह यांनी भूषविलेले पदच विद्यापीठाने चुकविलेले होते. भारतात देशाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष नव्हे तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही संविधानिक पदे आहेत. विद्यापीठाच्या विभागांमध्ये यावर शिकविण्यात येते. मात्र न्या.हिदायतुल्लाह यांना देशाचे माजी उपाध्यक्ष म्हणून नमूद करण्यात आले होते. ही चूक अखेर विद्यापीठाने सुधारली आहे.