नागपूर विद्यापीठ; अर्धे सत्र संपले, कंत्राटी प्राध्यापकांची भरती होणार कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:07 PM2018-09-13T12:07:51+5:302018-09-13T12:08:17+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे विविध पदव्युत्तर विभागांमध्ये कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्यापही पदभरतीच्या मुलाखतीला मुहूर्त लागलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही वेळापत्रक तयार झालेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे विविध पदव्युत्तर विभागांमध्ये कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण ९२ पदांवर ही भरती होणार असून यासंदर्भात विरोध असतानादेखील प्रशासन ठाम आहे. मात्र अद्यापही पदभरतीच्या मुलाखतीला मुहूर्त लागलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही वेळापत्रक तयार झालेले नाही. अशा स्थितीत अर्धे सत्र संपले असताना आता भरती होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर विद्यापीठातर्फे विविध पदव्युत्तर विभागांमध्ये कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ३० जुलै रोजी जाहिरातदेखील देण्यात आली. पदभरतीसाठी नियमित पदांप्रमाणेच शैक्षणिक पात्रता मागण्यात आली आहे. संबंधित जाहिरातीनुसार कंत्राटी प्राध्यापकांना प्रति महिना २४ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासंदर्भात ‘नुटा’ने आक्षेपदेखील उपस्थित केले.
मात्र महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठाच्या अधिनियमातील तरतुदींनुसारच ही पदभरती होत असल्याचे दावा प्रशासनातर्फे करण्यात आला. सद्यस्थितीत विद्यापीठात नियमित प्राध्यापकांच्या ३३४ पैकी १८५ जागा रिक्त आहेत. अशा स्थितीत कंत्राटी प्राध्यापकांची भरती करणे आवश्यक आहे. ही भरती नियमानुसार असून ती होईलच, असे कुलगुरूंनीदेखील स्पष्ट केले होते. साधारणत: सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत मुलाखतींची प्रक्रिया आटोपणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले होते. परंतु १२ सप्टेंबर उजाडूनदेखील मुलाखतींचा मुहूर्त अद्यापही उजाडलेला नाही. या पदभरतीसाठी ७०० हून अधिक उमेदवारांचे अर्ज आले होते व त्यांच्याकडून आता याबाबत विचारणा होत आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
आॅक्टोबर महिना उजाडणार ?
विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना आॅक्टोबर महिन्यात सुुरुवात होणार आहे तर नोव्हेंबरमध्ये बहुतेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नियमित सत्र परीक्षा सुरू होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आॅक्टोबर महिन्यातच पदभरतीसाठी मुलाखती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदभरती झाली तर कंत्राटी प्राध्यापकांना पहिल्या सत्रात शिकविण्याची फारशी संधी मिळणारच नाही.