नागपूर विद्यापीठ ; परीक्षा ओळखपत्रांवर चुकीचा फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:53 AM2018-11-23T11:53:35+5:302018-11-23T11:53:57+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये यंदा ओळखपत्रांच्या चुका होणार नाहीत, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. मात्र ओळखपत्रांवर भलत्याच विद्यार्थ्यांचे छायाचित्र छापून आले असल्याच्या तक्रारी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये यंदा ओळखपत्रांच्या चुका होणार नाहीत, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात काही विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांवर भलत्याच विद्यार्थ्यांचे छायाचित्र छापून आले असल्याच्या तक्रारी येत आहेत. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून ओळखपत्र दुरुस्तीसाठी पायपीट करावी लागत आहे.
सद्यस्थितीत हिवाळी परीक्षांचा चौथा टप्पा सुरू आहे. तर अनेकांच्या परीक्षा पुढील आठवड्यापासून सुरू होत आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा ओळखपत्रांमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. यात चुकीचे छायाचित्र, चुकीचे नाव, माहिती इत्यादींचा समावेश आहे.
विद्यापीठाने ओळखपत्रावर संबंधित विद्यार्थ्यांचा फोटो देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर चुकीचा फोटा छापण्यात आला आहे. काहींच्या ओळखपत्रावर तर मुलगा असून मुलीचा फोटो छापला गेल्याच्याही तक्रारी आहेत. तर अनेकांचे विषय बदलले असून काहीचे नावही चुकीचे छापण्यात आले आहे. विद्यापीठाकडून महाविद्यालयांना पंधरा दिवस अगोदरच ‘आॅनलाईन’ ओळखपत्र पाठविल्या जाते. मात्र प्रत्यक्षात महाविद्यालयांमध्ये परीक्षेच्या दोन ते तीन दिवस अगोदरच ओळखपत्र विद्यार्थ्यांना देण्यात येतात. अशा स्थितीत काही चूक असेल तर विद्यार्थ्यांना अगोदर परीक्षा भवन गाठावे लागते. यामुळे अभ्यासासाठी असलेला वेळ वाया जातो.
जबाबदारी निश्चित करणार : प्र-कुलगुरू
यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी विद्यापीठाकडे यासंदर्भात एकही लेखी तक्रार आली नसल्याचे स्पष्ट केले. जर विद्यार्थ्यांना काही समस्या असतील तर त्या लगेच सोडविण्यात येतील. ओळखपत्रात जर चुका झाल्या तर त्यासाठी कुणाला जबाबदार धरण्यात यावे, यासंदर्भात विद्यापीठातर्फे ठोस भूमिका घेण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.