नागपूर विद्यापीठ ; विधी विद्यार्थी शिकत आहेत जुना कायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:49 AM2019-03-11T11:49:56+5:302019-03-11T11:51:36+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी शाखेला अभ्यासक्रमात बदल करण्यास वेळच बहुदा मिळालेला नाही. त्यामुळेच ‘एलएलबी’च्या सहाव्या सत्रातील विद्यार्थी अद्यापही ‘लॉ ऑफ टॅक्सेशन’ या विषयांतर्गत जुन्या कर कायद्याचा अभ्यास करत आहेत.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात ‘जीएसटी’ लागू होऊन दीड वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. अनेक विद्यापीठांत यादृष्टीने अभ्यासक्रमांत बदलदेखील करण्यात आले आहेत. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी शाखेला अभ्यासक्रमात बदल करण्यास वेळच बहुदा मिळालेला नाही. त्यामुळेच ‘एलएलबी’च्या सहाव्या सत्रातील विद्यार्थी अद्यापही ‘लॉ ऑफ टॅक्सेशन’ या विषयांतर्गत जुन्या कर कायद्याचा अभ्यास करत आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे मागील महिन्यातच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांत बदल करुन ‘जीएसटी’चा समावेश करण्यात आला होता. असे असतानादेखील मानव्यशास्त्र विभागाचे तत्कालीन अधिष्ठाता व विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीकांत कोमावार व सध्याचे अधिष्ठाता यांनी अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही. ‘जीएसटी’ शिकावे की कालबाह्य झालेल्या ‘व्हॅट’ व ‘सेल्स टॅक्स’चा अभ्यास करावा असा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार मागील दीड वर्षात विधीच्या अभ्यास मंडळाची अनेकदा बैठक झाली. मात्र अभ्यासक्रमांबाबत हलगर्जीपणाच दाखविण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी ‘जीएसटी’ शिकू शकले नाहीत.
पुढील सत्रात बदल करणार
यासंबंधात डॉ.कोमावार यांच्याशी संपर्क केला असता पुढील शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रमात बदल करु, असे त्यांनी सांगितले. वर्तमान अभ्यासक्रमात बदल का झाला नाही, याबाबत ते कुठलेही ठोस उत्तर देऊ शकले नाही.