नागपूर विद्यापीठ; आता ‘प्रॉस्पेक्टस’मधून कमाई करता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 02:20 PM2018-12-18T14:20:45+5:302018-12-18T14:21:57+5:30
प्रवेशप्रक्रियेच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांकडून ‘प्रॉस्पेक्टस’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेण्यात येते. मात्र महाविद्यालयांच्या या प्रकारांवर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अंकुश लावण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवेशप्रक्रियेच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांकडून ‘प्रॉस्पेक्टस’च्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम घेण्यात येते. मात्र महाविद्यालयांच्या या प्रकारांवर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अंकुश लावण्यात येणार आहे. महाविद्यालयांना ‘प्रॉस्पेक्टस’मधून कमाई करता येणार नाही व परवडणाऱ्या दरातच त्याची विक्री झाली पाहिजे, अशी शिफारस आयोगाकडून करण्यात येणार आहे. तक्रार निवारणासंदर्भातील नियमावलीत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून सुधारणा करण्यात येत आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने सुधारित नियमावलींचा प्रस्ताव तयार केला आहे. यात यासंदर्भात स्पष्ट उल्लेख करण्यात आले आहेत.
अनेक महाविद्यालयांकडून तेथील सुविधा, शिक्षक, शुल्क इत्यादींची माहिती ‘प्रॉस्पेक्टस’मध्ये देण्याचे टाळण्यात येते. शिवाय संकेतस्थळावरदेखील योग्य माहिती नसते. असा स्थितीत विद्यार्थ्यांची अनेकदा दिशाभूल होते. एकदा प्रवेश झाल्यावर मग तक्रार करूनदेखील भरपाई होणे कठीण असते.
विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१२ साली तक्रार निवारण नियमावली जारी केली होती. मात्र या नियमावलीचे योग्य पालन होत नसून ठोस कारवाईची तरतूद नसल्याने विद्यापीठ व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे गंभीरतेने पाहिल्या जात नसल्याच्या तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या. यानंतर आयोगातर्फे तक्रार निवारण नियमावलीत सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली. या समितीने नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. प्रत्येक महाविद्यालयाला संकेतस्थळावर ‘प्रॉस्पेक्टस’ टाकणे अनिवार्य करण्यात येणार आहे.