नागपूर विद्यापीठ : परत एकदा प्रसारमाध्यम बंदीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:42 AM2019-03-20T00:42:28+5:302019-03-20T00:43:30+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना कुलगुरूंनी प्रवेश नाकारल्याच्या मुद्यावरून बराच वाद झाला होता. मात्र हे प्रकरण थंड होत नाही तेच कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी परत एकदा प्रसारमाध्यमांवर बंदी लावण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना कुलगुरूंनी प्रवेश नाकारल्याच्या मुद्यावरून बराच वाद झाला होता. मात्र हे प्रकरण थंड होत नाही तेच कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी परत एकदा प्रसारमाध्यमांवर बंदी लावण्याचा प्रयत्न केला.
मंगळवारी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीदरम्यान अजेंड्याला सुरुवात होण्याअगोदर कुलगुरूंनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा हवाला देत बैठकीतील माहिती प्रसारमाध्यमांना न देण्याची सूचना केली. यानंतर काही सदस्य आक्रमक झाले व त्यांनी स्पष्टीकरण मागितले. राज्य शासनाने कुठल्या अधिकाराअंतर्गत परिषदेच्या निर्वाचित आलेल्या सदस्यांवर निर्बंध लावले आहेत. यासंबंधात राज्य शासनाकडून पूर्ण माहिती घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. डॉ.काणे यांच्या निर्देशांना मानण्यास सदस्यांनी नकार दिला.
१५ कोटींची मंजुरी देण्यास नकार
बैठकीदरम्यान विद्यापीठातर्फे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावांमधील अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यास नकार देण्यात आला. खरेदी समितीच्या सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. मग व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यांना ठेवण्यास उशीर का झाला, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. सदस्यांना बैठकीचा अजेंडा काही दिवस अगोदर मिळाला आहे. अशा स्थितीत प्रस्तावांना नीट पद्धतीने वाचू शकले नाहीत. त्यामुळे याला मंजुरी देऊ शकत नाही, असे सदस्यांनी स्पष्ट केले.