विद्यापीठाची पोलखोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 01:50 AM2017-09-14T01:50:49+5:302017-09-14T01:51:04+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘कॅम्पस’ परिसर बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने दणाणून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘कॅम्पस’ परिसर बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने दणाणून गेला. विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी चक्क ‘कॅम्पस’चे प्रवेशद्वार बंद करुन तेथेच अडीच तास ठिय्या दिला. वर्गांसाठी आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांनादेखील प्रवेश रोखण्यात आला. अखेर कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिवांना धाव घ्यावी लागली व विद्यार्थ्यांशी चर्चा झाल्यानंतरच हा तणाव दूर झाला. या आंदोलनामुळे बुधवारी अनेक विभागांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून आली.
नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मधील विविध पदव्युत्तर विभागांमध्ये पाण्याची सुविधा, स्वच्छता यांचा अभाव आहे. शिवाय विद्यार्थिनींच्या ‘कॉमन रुम’ची दुरवस्था झाली आहे. विद्यार्थिनींच्या वसतिगृहापासून थेट बस नसल्यामुळेदेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
या समस्या वारंवार प्रशासनासमोर मांडल्यावरदेखील काहीच पावले उचलण्यात येत नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सकाळी १० च्या सुमारास विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारासमोरच ठाण मांडले आणि प्रशासनाविरोधात निदर्शने सुरू केली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांना पाचारण करण्यात आले. शिवाय कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पुरण मेश्राम हेदेखील ‘कॅम्पस’ला पोहोचले. अधिकाºयांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून काही मागण्या तात्काळ मान्य केल्या व अखेर प्रवेशद्वार मोकळे झाले.
मान्य झालेल्या मागण्यादेखील मांडल्या
विद्यार्थ्यांनी अधिकाºयांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. विद्यापीठाचे मुलींचे वसतिगृह ते ‘कॅम्पस’ या मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी मनपाने नकार दिला असला तरी विद्यापीठ पुढाकार घेईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले. शिवाय तिन्ही भाषांत अध्यापनासंदर्भात विभागप्रमुखांना सूचित करण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सूचनांसाठी प्रत्येक विभागात तक्रारपेटी लावण्याची मागणीही कुलगुरूंनी मान्य केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये २४ तास वाचनालय सुविधा आणि ग्रंथालयात मुक्त प्रवेश यांचादेखील समावेश होता. मात्र या मागण्या अगोदरच पूर्ण झाल्या असून यांचा उल्लेख येथे का केला या शब्दांत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना फटकारले.
या समस्यांसाठी आंदोलन
पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही
अस्वच्छ प्रसाधनगृहे
वॉटर कूलरची अनियमित सफाई
विद्यार्थिनी वसतिगृहापर्यंत थेट बससेवा नाही
तिन्ही भाषांत अध्यापनाचा अभाव