रातुम नागपूर विद्यापीठ! सेवानिवृत्तांचा सत्कार यापुढे दीक्षांत सभागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:15 AM2018-08-02T11:15:52+5:302018-08-02T11:42:09+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची भावना लक्षात घेता यापुढे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाच्यावतीने दीक्षांत सभागृहात विशेष सन्मान करण्यात येईल, असा मानस कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ‘पार्किंग’च्या जागेत घ्यावा लागल्याच्या मुद्यावरुन कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांची भावना लक्षात घेता यापुढे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विद्यापीठाच्यावतीने दीक्षांत सभागृहात विशेष सन्मान करण्यात येईल, असा मानस कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केला. यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.
नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागातील अधीक्षक प्रकाश मांडवकर मंगळवारी निवृत्त झाले. विद्यापीठाला सुमारे ३० वर्षे सेवा दिल्यामुळे कर्मचारी संघटनेने त्यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम दीक्षांत सभागृहात घेऊ द्यावा, अशी परवानगी मागितली होती. मात्र विद्यापीठ कर्मचारी संघटना ही खासगी असल्याचे कारण देत विद्यापीठाने परवानगी नाकारली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशदाराच्या बाहेर असलेल्या ‘पार्किंग’च्या जागेजवळ हा कार्यक्रम घेतला. बुधवारी विद्यापीठ वर्तुळात यावरुन संतप्त प्रतिक्रिया आल्या. अधिकाऱ्यांचे निरोप समारंभ दीक्षांत सभागृहात आयोजित केले जातात. मग आपले आयुष्य विद्यापीठासाठी वेचणाऱ्या व समर्पित भावनेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमवेत दुजाभाव का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा केली असता विद्यापीठ कर्मचारी संघटना ही खासगी असल्यामुळे त्यांना दीक्षांत सभागृह देता आले नाही. मात्र विद्यापीठात इतरही सभागृह होते. तेथे सहजपणे कार्यक्रम करता आला असता असे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे विद्यापीठात कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी सेवानिवृत्त होणार असेल तर त्याचा कार्यक्रम विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येईल.
अमरावतीत ‘कर्तव्यपूर्ती’, नागपुरात दुजाभाव का ?
एकीकडे विद्यापीठाने कर्मचाऱ्यांना दीक्षांत सभागृह नाकारले असताना दुसरीकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते तेथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाने याला कर्तव्यपूर्ती सोहळा असे नाव दिले. वाहनचालक व परीक्षा सहायक यांचा कुलगुरूंचा हस्ते सत्कार झाला. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी निमंत्रण देऊनदेखील येण्याची तसदी दाखविली नाही, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.