विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षेबाबत दिशानिर्देश द्यावे : अभाविपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:08 PM2020-05-27T19:08:02+5:302020-05-27T19:10:03+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात धोरण निश्चित न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर दिशानिर्देश जारी करावेत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात धोरण निश्चित न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर दिशानिर्देश जारी करावेत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालयांच्या होम सेंटरवरच घेता येईल व संचालन विद्यापीठाने करावे, असे अभाविपतर्फे मांडण्यात आले आहे.
बऱ्याच महाविद्यालयाचे अभ्यासक्रम पूर्ण झालेले नाही, परीक्षेची गुणवत्ता लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होऊ नये याकरिता विद्यापीठाने कमीत कमी समान अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घ्यावी. अभ्यासक्रमावर आधारित परिपत्रक विद्यापीठाद्वारे काढण्यात यावे. त्याचप्रमाणे विद्यापीठात शिक्षण घेणाºया इतर राज्यातील विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या घरीच परीक्षा केंद्र द्यावे. उत्तरपत्रिका पीडीएफ द्वारा अथवा इतर सोशल मीडिया द्वारा पाठवण्याची मुभा द्यावी, अशी सूचना अभाविपतर्फे करण्यात आली आहे.
तालुकास्तरावर परीक्षा घ्या
विद्यापीठ क्षेत्रातील तालुका स्तरावर परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थी ज्या गावी अडकला असेल त्याला तेथेच परीक्षा देण्याची व्यवस्था विद्यापीठातर्फे करण्यात यावी. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे असे परिपत्रक विद्यापीठाने जारी करावे. तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मागील सत्रात राहिलेल्या विषयांमुळे त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट करावी व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी अभाविपचे महानगरमंत्री अमित पटले यांनी केली आहे.