विद्यापीठातील विद्यार्थी करणार आता हिंदू धर्माच्या संस्कृतीचा अभ्यास
By आनंद डेकाटे | Published: May 21, 2024 06:34 PM2024-05-21T18:34:52+5:302024-05-21T18:35:14+5:30
Nagpur : हिंदू धर्म संस्कृती मंदिरासोबत सामंजस्य करार; भारतीय ज्ञान परंपरेचे विद्यार्थ्यांना मिळविता येणार ज्ञान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थी आता हिंदू धर्माच्या संस्कृतीचा अभ्यास करतील. या माध्यमातून त्यांना भारतीय ज्ञान परंपरेचे संशोधन करणे शक्य होणार आहे. याबाबत हिंदू धर्म संस्कृती मंदिरा सोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जमनालाल बजाज प्रशासकीय भवन येथे आयोजित कार्यक्रमात या सामंजस्य कराराचे हस्तांतरण मंगळवारी करण्यात आले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये 'भारतीय ज्ञान परंपरा' याचा समावेश करण्यात आला आहे. एनईपी २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरा अभ्यासता यावी. यावर अधिक संशोधन करता यावे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हिंदू धर्म संस्कृती मंदिरा सोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. राजू हिवसे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश सिंह आणि हिंदू धर्म संस्कृती मंदिर यांच्या वतीने डॉ. सुधाकर इंगळे व मंगेश श्रीराम जोशी यांनी स्वाक्षरी केली आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या कक्षात झालेल्या कार्यक्रमाला प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश सिंह, डॉ. माधवी मार्डीकर, डॉ. सतीश चाफले, हिंदू धर्म संस्कृती मंदिराचे डॉ. सुधाकर इंगळे, मंगेश जोशी, अर्थश्री मराठे, श्रीरंग चितळे, राजेश दामले, तुरळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्राचीन साहित्यावर होणार संशोधन
भारतीय प्राचीन ज्ञानासंबंधी साहित्य हिंदू धर्म संस्कृती मंदिर यांच्याकडे संरक्षित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास करू इच्छिणारे संशोधक तसेच विद्यार्थ्यांना हिंदू धर संस्कृती मंदिर यांच्याकडील प्राचीन भारतीय साहित्य संशोधनाकरिता हाताळता येणार आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेचा सखोल अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यापीठ तसेच हिंदू धर्म संस्कृती मंदिर यांच्या दरम्यान शैक्षणिक आदान प्रदान देखील केले जाणार आहे. त्याचप्रमाणे पारंपरिक संशोधन देवान घेवान देखील होणार आहे. या सोबतच परिषदा, सेमिनार, कार्यशाळा, सिम्पोजियम, विविध स्पर्धा, श्रेयांक बदल आधी उपक्रम राबविण्यात येईल.