विद्यापीठात मूल्यांकनाचे ‘मॅजिक’?
By admin | Published: August 4, 2014 12:49 AM2014-08-04T00:49:28+5:302014-08-04T00:49:28+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे संपल्याचे दावे करण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधारच असल्याचे चित्र आहे.
एलएलबी अभ्यासक्रम : दोन विषयांत विद्यार्थ्यांना ‘सेम टू सेम’ गुण
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरळीतपणे संपल्याचे दावे करण्यात येत आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र दिव्याखाली अंधारच असल्याचे चित्र आहे. तीन वर्षीय ‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरच्या (सीबीएस) निकालात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चक्क दोन विषयांत सारखे गुण देण्याची बाब समोर आली आहे. या मागे विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रणालीचे ‘मॅजिक’ आहे की घाईगडबडीत झालेला सावळागोंधळ असा संभ्रम निर्माण झाला आहे. शंभराव्या दीक्षांत समारंभाची तयारी करणाऱ्या विद्यापीठाने अजूनही काही धडा घेतला नाही का असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे.
‘एलएलबी’च्या चौथ्या सेमिस्टरची परीक्षा मे च्या दुसऱ्या पंधरवड्यात संपली. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनंतर २८ जुलै रोजी विद्यार्थ्यांचा निकाल लागला. परंतु संकेतस्थळावर गुणपत्रिका पाहताच विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जे विद्यार्थी परीक्षेत अनुपस्थित होते, त्यांना चक्क गुण देण्यात आले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच चांगले गुण मिळत होते, त्यांना अनुपस्थित दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना विचारणा केल्यानंतर त्यांना आणखी एक धक्का बसला. ‘लेबर लॉ-२’ आणि ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ या दोन्ही विषयांत विद्यार्थ्याला सारखे गुण देण्यात आले आहेत. म्हणजेच ‘लेबर लॉ-२’मध्ये ४५ गुण असतील तर ‘पब्लिक इंटरनॅशनल लॉ’ या विषयातही तितकेच गुण आहेत. एक-दोन विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा योगायोग होऊ शकतो. परंतु ६० ते ७० विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेला हा योगायोग की विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा नमुना असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंबंधात संकेतस्थळावर पाहणी केली असता रविवारी संबंधित निकाल काढून घेतला असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)