विद्यापीठाचे काम ‘पेपरलेस’ व्हावे
By admin | Published: September 27, 2015 02:45 AM2015-09-27T02:45:41+5:302015-09-27T02:45:41+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची नवी प्रशासकीय इमारत पूर्णत: ‘ग्रीन’ व आकर्षक व्हायला हवी.
देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची नवी प्रशासकीय इमारत पूर्णत: ‘ग्रीन’ व आकर्षक व्हायला हवी. विद्यापीठानेही आता ‘स्मार्ट’ रूप घेण्याची गरज असून दोन वर्षांनी नव्या इमारतीत प्रवेश करताना प्रशासनाचे काम ‘पेपरलेस’ व्हायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. नागपूर विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कोनशिलेचे शनिवारी अनावरण झाले. त्यानंतर गुरुनानक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख, आ. प्रकाश गजभिये, बजाज आॅटो समूहाचे चेअरमन राहुल बजाज, कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले प्रामुख्याने उपस्थित होते. प्रशासकीय इमारत परिसरात नवे दीक्षांत सभागृह बांधण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. हे सभागृह भव्य व राज्यातील सर्वांत सुंदर सभागृह असले पाहिजे. या सभागृहाचा उपयोग शैक्षणिक कार्यांसोबत सामाजिक कार्यक्रमांसाठीदेखील व्हायला हवा. अत्याधुनिक व दर्जेदार सभागृह उभारण्यासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
विद्यापीठाला १० कोटी रुपयांची मदत देताना आनंद होत आहे. ही इमारत दोन वर्षांत उभी राहील असे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. त्यामुळे १ आॅक्टोबरपासून याचे ‘काऊंटडाऊन’ सुरू होईल असे प्रतिपादन राहुल बजाज यांनी केले. डॉ.येवले यांनी प्रास्ताविकात प्रशासकीय इमारतीच्या स्वरुपाबाबत माहिती दिली. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले तर कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांनी आभार मानले.
वेळ पडली तर नियमांत बदल
कुलगुरू डॉ. काणे यांनी अत्याधुनिक इमारत दोन वर्षांत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले. शिवाय दीक्षांत सभागृहासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. या इमारतीचा वापर इतर सामाजिक कार्यांसाठी करून देण्यात येईल. यासाठी वेळ पडली तर नियमांना बगल देऊ किंवा नियमांत बदल करू, असे प्रतिपादन डॉ. काणे यांनी केले.(प्रतिनिधी)
तीन मिनिटांचे पाच कोटी!
कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राहुल बजाज दोघांमधील मौखिक करारातून विद्यापीठाला आणखी पाच कोटींचा निधी मिळाला. मी कार्यक्रमात आठ मिनिटे बोलेन असे बजाज यांनी कबूल केले होते. परंतु आता मी केवळ पाच मिनिटेच बोलतो व वाचलेल्या तीन मिनिटांच्या बदल्यात बजाज यांनी विद्यापीठाला आणखी पाच कोटींची मदत द्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर बजाज यांनी नवे दीक्षांत सभागृह सर्वांना उपलब्ध करून द्यावे, अशी अट टाकत अतिरिक्त निधी देण्याची कबुली दिली. इमारत बांधकामाच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम बजाज समूहाकडून देण्याची घोषणा त्यांनी केली.