न कळत होऊन गेलेला कोरोनाही धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 08:54 PM2021-01-08T20:54:35+5:302021-01-08T20:57:11+5:30
Unknowingly affected corona dangerous सिरो सर्वेक्षणात नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोविड होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, यातील काहींना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिरो सर्वेक्षणात नागपूर शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोविड होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक म्हणजे, यातील काहींना गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच पुढे आलेल्या अशाच एका रुग्णाला पॅरालिसीसचा झटका येऊन दोन्ही डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचे आढळून आले. यामुळे सामान्यांसह डॉक्टरांनीही अधिक जागृक होण्याचे आवाहन केले जात आहे.
मधुमेह, लठ्ठपणा किंवा कुठलाही गंभीर आजाराची लक्षणे नसलेल्या एका ५२ वर्षीय पुरुषाची दृष्टी अचानक कमी झाली. रुग्णाने ऑरेंज सिटी हॉस्पिटल गाठले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अभय आगाशे यांनी तपासून चष्म्याचा नंबर दिला. परंतु दोन दिवसानंतर चष्म्याचा उपयोग होत नसल्याची समस्या रुग्णाने मांडली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. डोळ्याचा रेटिना सामान्य होता. परंतु दोन्ही डोळ्यांनी उजव्या भागात कमी दिसत असल्याचे आढळून आले. यामुळे पुढील तपासणीसाठी रुग्णाला मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. आनंद सोमकुवर यांच्याकडे पाठविले. त्यांनी काही तपासण्या केल्या. यात डोळ्यातून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी असल्याचे निदान झाले. त्यांना पॅरालिसीसचा झटका येऊन गेला होता. परंतु यामागील नेमके काय कारण होते ते पाहण्यासाठी डॉक्टरांनी त्याची आरटीपीसीआर चाचणी केली.ती निगेटिव्ह आली. शेवटी अॅण्टिबॉडीज तपासणी केली. यात रुग्णाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अॅण्डिबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले. त्यांच्या न कळत त्यांंना कोविड होऊन गेला होता. यामुळे रक्ताची गुठळी होऊन दृष्टी अधू झाली होती. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष नको
नागपूर जिल्ह्यातील कोरोनबाधितांची संख्या १ लाख २६ हजारावर गेली आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नव्हती. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, सिरो सर्वेक्षणाच्या अहवालानुसार शहरातील ४९ टक्के लोकांना त्यांच्या न कळत कोरोना होऊन गेला आहे. यामुळे कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करणे जोखमीचे झाले आहे. पोस्ट कोविड उपचाराला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.
-डॉ. अनुप मरार