अज्ञात वाहनाची धडक, दुध विक्रेता युवक जागीच ठार; वृद्ध आईवर दुःखाचा डोंगर
By दयानंद पाईकराव | Published: February 12, 2024 10:07 PM2024-02-12T22:07:07+5:302024-02-12T22:07:30+5:30
ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून युवकाच्या मृत्युमुळे त्याच्या वृद्ध आईवर संकट कोसळले आहे.
नागपूर : दुधाच्या विक्रीचा व्यवसाय करीत असलेला २० वर्षांचा युवक दुध आणण्यासाठी खेडी गावाकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या अॅक्टीव्हाला धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून युवकाच्या मृत्युमुळे त्याच्या वृद्ध आईवर संकट कोसळले आहे.
संकेत विजय घरडे (३०, रा. मैत्री बौद्ध विहाराजवळ, अजनी) असे मृत दुध विक्रेत्या युवकाचे नाव आहे. तो आपला भाऊ अक्षय विजय घरडे (३२) सोबत दुधाच्या विक्रीचा व्यवसाय करीत होता. खेडेगावातून दुध आणून तो घरोघरी दुध विकत होता. संकेतच्या कुटुंबात त्याची वृद्ध आई आणि मोठा भाऊ आहे. सोमवारी सकाळी संकेत आपली अॅक्टीव्हा गाडी क्रमांक एम. एच. ४९, पी-६५६१ ने दुध आणण्यासाठी खेडी गावाकडे जात होता. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबलपूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या कॉर्नरला उमरेड ओव्हरब्रीजजवळ अज्ञात वाहनचालकाने संकेतच्या अॅक्टीव्हाला धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला.
जखमी संकेतला उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी संकेतचा भाऊ अक्षयने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. संकेतच्या अकस्मात मृत्युमुळे त्याच्या वृद्ध आईवर संकट कोसळले आहे.