आजपासून अनलॉक, निर्बंध नावापूरतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:06 AM2021-06-21T04:06:57+5:302021-06-21T04:06:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन नागपुरातील दुकाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजन बेडची उपलब्धता व दैनंदिन रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन नागपुरातील दुकाने आता रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात सुधारित आदेश शुक्रवारी जारी झाले आहेत. निर्बंध आता नावापुरतेच राहिले आहे. बार रेस्टाॅरंट, चित्रपटगृह आदी सर्वांनाच परवानगी मिळाली असून सोमवारपासून नागपूर खऱ्या अर्थाने अनलॉक होणार आहे.
नागपुरातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती बरीचशी आटोक्यात आली आहे. नागपूर अजूनही पहिल्या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. तरीही जिल्हा व मनपा प्रशासन संयमाने परिस्थिती हाताळत आहे. कुठलीही घाई न करता हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहेत. मागील दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंधांमध्ये आणखी सवलत देत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असणारी सर्व दुकाने आता रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील तर रेस्टाॅरंट, बार रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून याची अंमलबजावणी होईल.
२८ जूनला पुन्हा आढावा
नवे आदेश सोमवार २१ जून सकाळी ७ वाजतापासून तर २८ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहतील. त्यानंतर पुन्हा आढावा घेऊन परिस्थितीनुसार निर्बंध आणखी शिथिल करायचे की कडक करायचे, याचा निर्णय घेतला जाईल.
बॉक्स
नागरिकांची जबाबदारी वाढली
सरकार व प्रशासनाने तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविलेली आहे. सोमवारपासून नागपुरात गर्दी वाढेल. तेव्हा नागरिकांचीच जबाबदारी आता वाढली आहे. नागरिकांनी स्वत:च काळजी घ्यावी. शक्यतोवर सुरक्षित अंतराचे पालन करावे. मास्क वापरावा.
असे राहतील नियम
- सर्व प्रकारची दुकाने व आस्थापने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू.
- शहरातील मॉल, चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स नाट्यगृह, ५० टक्के क्षमतेमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
- उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेत रात्री ११ पर्यंत सुरू ठेवता येतील.
- लोकल ट्रेन, मेट्रो नियमित सुरू राहतील.
- सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वाॅकिंग, सायकलिंगसाठी सकाळी पाच ते नऊ व सायंकाळी पाच ते नऊ परवानगी आहे.
- खासगी कार्यालय व शासकीय कार्यालये नियमित सुरू.
- सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हॉलच्या पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी. मात्र ही क्षमता १०० व्यक्तींपर्यंत मर्यादित.
- अंत्यसंस्काराला अधिकाधिक ५० लोकांना उपस्थित राहता येईल.
- बांधकाम करण्यास परवानगी आहे.
- कृषी, शेतीच्या सर्व कामांना रात्री ८ वाजेपर्यंत परवानगी आहे.
- ई-कॉमर्स साहित्य व सेवा पुरवठा नियमित.
- जिम, सलून, सौंदर्य केंद्र, स्पा, वेलनेस केंद्र रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील.
- सार्वजनिक वाहतूक, मालवाहतुकीला परवानगी असेल. मात्र बसमध्ये उभे राहून प्रवासास निर्बंध.
- सर्व उद्योग-कारखाने नियमितपणे सुरू
- सर्व जलतरण तलाव बंद असतील-
- शाळ-महाविद्यालये बंदच राहणार
- अम्युजमेंट पार्क रात्री ८ पर्यंत उघडे असतील
- बोटिंगला नियमित परवानगी आहे.
- वाचनालय वाचन कक्ष, अभ्यास कक्ष रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असतील.
- आधार कार्ड सेंटर नियमितपणे सुरू असेल
- शॉपिंग मॉलमधील रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेमध्ये रात्री ११ पर्यंत.
- गोरेवाडा जंगल सफारी रात्री ८ पर्यंत सुरू असेल
- शासकीय, निमशासकीय प्रशिक्षण संस्था नियमितपणे सुरू असतील.
- कोचिंग क्लासेस ५० टक्के क्षमतेत, मात्र २० विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी क्लासमध्ये बसवता येणार नाहीत.
- खेळाची मैदाने, आउटडोअर व इनडोअर स्टेडियम सकाळी ५ ते ९ व सायंकाळी ५ ते ९ सुरू असतील.
- चित्रपट, सिरियल व व्यावसायिक चित्रीकरण (शूटिंग) नियमितपणे करता येईल.