संघ मुख्यालयाजवळ बेवारस कार

By admin | Published: March 26, 2017 01:34 AM2017-03-26T01:34:03+5:302017-03-26T01:34:03+5:30

संघ मुख्यालयाजवळ शुक्रवारी रात्री संशयास्पद अवस्थेत विना नंबरप्लेटची कार आढळल्याने पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची प्रचंड तारांबळ उडाली.

Unmanned car near the Union headquarters | संघ मुख्यालयाजवळ बेवारस कार

संघ मुख्यालयाजवळ बेवारस कार

Next

जबलपूरच्या तरुणाने उडविली खळबळ : पोलिसांची तारांबळ
नागपूर : संघ मुख्यालयाजवळ शुक्रवारी रात्री संशयास्पद अवस्थेत विना नंबरप्लेटची कार आढळल्याने पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांची प्रचंड तारांबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच शीघ्र कृती दलाच्या जवानांसह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. ताब्यात घेतलेल्या कारच्या तपासणीनंतर कारमालकाचा शोध लागला अन् जबलपूरच्या तरुणाने ती अनवधानाने तेथे पार्क करून ठेवल्याचे कळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचा जीव भांड्यात पडला. संघ मुख्यालयाजवळ शुक्रवारी रात्री दोन ते तीन तासांपासून एक सिल्व्हर कलरची आय-२० कार उभी होती.
मागे आणि पुढे दोन्ही नंबरप्लेट नसल्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्यांसोबतच गस्तीवरील पोलिसांचेही त्याकडे लक्ष वेधले गेले. मध्यरात्री १२ ची वेळ होऊनही कारचा मालक तेथे आला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा अस्वस्थ झाली. वरिष्ठांना माहिती कळताच त्यांनी संघ मुख्यालयाकडे धाव घेतली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना आणि संघ मुख्यालयाच्या आतील भागातही अत्युच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे ही यंत्रणासुद्धा सतर्क झाली. सर्वत्र फोन खणखणू लागले. मोठा पोलीस ताफा, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे (बीडीडीएस) श्वान, शीघ्र कृती दल, अग्निशमन दल आणि क्रेनही घटनास्थळी बोलावून घेण्यात आली. कार क्रेनने उचलून बाजूच्या मैदानात नेण्यात आली. बीडीडीएसच्या श्वानाने कारची तपासणी केल्यानंतर आतमध्ये काहीच नसल्याचे त्याने संकेत दिले.(प्रतिनिधी)

... मामाच्या घरी सापडले!
जबलपूरच्या स्वप्निल जैन यांची ही कार होती. ते शुक्रवारी नागपुरात आले. त्यांचे मामा संजय प्रेमचंद जैन बाजूलाच राहतात. त्यामुळे स्वप्निल मामाच्या घरी आले होते. संपर्क होताच पोलीस जैन यांच्याकडे पोहोचले. त्यानंतर स्वप्निलसह पोलीस कारजवळ पोहोचले. नुकतीच कार घेतल्यामुळे त्यावर नंबर प्लेट लावायची राहून गेल्याचा खुलासा त्यांनी केला. पोलिसांनी रात्रभर चौकशी केली. कुठलाही संशयास्पद धागादोरा सापडला नाही. अनवधानाने ही कार या संवेदनशील ठिकाणी ठेवण्यात आली, असे स्पष्ट झाले. वरिष्ठांकडे तसे कळविण्यात आले अन् सुरक्षा यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी जुजबी कलमानुसार स्वप्निलवर गुन्हा दाखल केला.

Web Title: Unmanned car near the Union headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.