जिल्ह्यात अनधिकृत शाळा; संचालकांवर गुन्हे दाखल करा, जि.प. अध्यक्षांचे शिक्षण विभागाला निर्देश
By गणेश हुड | Published: September 22, 2023 01:16 PM2023-09-22T13:16:57+5:302023-09-22T13:17:33+5:30
अनधिकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
नागपूर : जिल्ह्यात अनेक अनधिकृत खासगी शाळा सुरू आहेत. या शाळांतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याने अशा संस्था चालकांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिले.
अनधिकृत खासगी शाळांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागाकडून संबंधित पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले होते. परंतु पोलिस विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. संस्था चालकांच्या गैरप्रकाराला आळा बसावा, यासाठी पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक यांच्याशी समन्वय साधून संबंधित शाळांवर कार्यवाही करण्याबाबत अध्यक्षांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना केली. बैठकीला मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सभापती अवंतिका लेकुरवाळे, मिलिंद सुटे, प्रवीण जोध, राजकुमार सुसुंबे, माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, विरोधी पक्षनेते आतीश उमरे, दिनेश बंग, संजय झाडे, ज्ञानेश्वर कंभाले आदी उपस्थित होते.
कृषी विकास अधिकारी यांना परत पाठवा
मागील स्थायी समिती समेत कृषी विकास अधिकारी संजय पिंगट यांच्या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी खुलासा सादर केला परंतु त्यांचा खुलासा समर्पक नसल्यामुळे समितीने तो अमान्य करण्यात आला. कृषी विकास अधिकारी याना शासनास परत पाठविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.
धानला आरोग्य केंद्राचे ऑडिट करा
तीन वर्षापूर्वी धानला येथे बांधकाम झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीस भेगा पडल्या आहे. याची तपासणी करण्याची मागणी तापेश्वर वैद्य यांनी केली होती. त्यानुसार या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत आदेश देण्यात आले.