असंघटित कामगारांनी श्रमयोगी मानधन आणि निवृत्ती वेतन योजनांचा लाभ घ्यावा : श्रीकांत फडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:13 PM2019-11-29T23:13:49+5:302019-11-29T23:15:02+5:30
३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व असंघटित कामगार, बांधकाम कामगार, अंगणवाडी सेविका, बचतगट सदस्य, घरगुती कामगार, फेरीवाले, रिक्षाचालक, वीटभट्टी कामगार, शेतमजूर, मनरेगा कामगार, मच्छिमार कामगार आणि इतर कामगार संघटना इत्यादी क्षेत्रातून कार्यरत कामगारांसाठी कामगार कल्याण विभागाच्यावतीने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेद्वारे केले.
या योजनेंतर्गत ६० वर्षे वयानंतर ३ हजार रुपये प्रति महिना किमान निवृत्ती वेतन देण्यात येणार असल्याचे श्रीकांत फडके यांनी सांगितले. वर्गणीदार मृत झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेन्शन लागू होईल. कोणत्याही वेळेस पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी सदस्यांसाठी १८ वर्षे वयापर्यंत रुपये ५५ तर ४० वर्षे वयापर्यंत २०० रुपये दरमहा वयोमानानुसार अंशदान निर्धारित करण्यात आले आहे. लिंक खात्यातून पहिल्या हप्त्यानंतर ऑटो डेबिट सुविधा देण्यात येणार असून यासाठी केंद्र सरकारकडून मासिक अंशदान मिळणार आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्था व एलआयसीद्वारे व्यवस्थापित निधी व्याजासकट परत मिळणार आहे. या शिबिराचे आयोजन महानगरपालिकेच्या दहा झोन कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी, उमरेड, काटोल, कळमेश्वर नगरपालिकामध्ये ३ डिसेंबर रोजी, सावनेर, रामटेक, कामठी नगरपालिका ४ डिसेंबर तर उमरेड, बुटीबोरी, कन्हान, पिपरी, वाडी नगरपालिका येथे ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत करण्यात आले आहे.
नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध असून याची नोंदणी या सप्ताहानंतरही सुरू राहील. नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी असून नोंदणी करण्यासाठी पात्र कामगारांजवळ आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत तसेच भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे.
यावेळी केंद्रीय कामगार कल्याण आयुक्त पी. गणेशन, अपर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे, सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे तसेच बाल कल्याण विभागाचे समन्वयक दिनेश ठाकरे उपस्थित होते.