दिवाळीत २७ वर्षानंतर सूर्यग्रहणाचा अभूतपूर्व साेहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 08:22 PM2022-10-25T20:22:04+5:302022-10-25T20:23:30+5:30
Nagpur News ग्रहण पाहू नका, ग्रहणात बाहेर पडू नका, अशा भाकड अंधश्रद्धांना बाजूला ठेवत नागपूरकरांनी सूर्यग्रहणाचा अभूतपूर्व साेहळा मंगळवारी अनुभवला.
नागपूर : ग्रहण पाहू नका, ग्रहणात बाहेर पडू नका, अशा भाकड अंधश्रद्धांना बाजूला ठेवत नागपूरकरांनी सूर्यग्रहणाचा अभूतपूर्व साेहळा मंगळवारी अनुभवला. २०२२ सालचे हे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण हाेते. विशेष म्हणजे, तब्बल २७ वर्षानंतर दिवाळी सणाच्या काळात सूर्यग्रहणाचा याेग जुळून आला हाेता. त्यामुळे नागपूरकरांनी अगदी उत्साहात खंडग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव घेत जणू दिवाळीच साजरी केली.
ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा सूर्याचा काही भाग चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. यादरम्यान जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये अंशतः येतो तेव्हा सूर्याचा काही भाग झाकला जातो. या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. दर अमावस्येला सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येताे; पण ताे एका रेषेत नसताे. २५ ऑक्टाेबरला ते एका रेषेत हाेते; पण पूर्णपणे नाही. त्यामुळे सूर्याचा काहीच भाग चंद्रामुळे झाकला गेला. साधारणत: सायंकाळी ४.४४ वाजता सूर्यग्रहणाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, सूर्य मावळतीच्या काळात ग्रहण सुरू झाल्याने चंद्राच्या काेरप्रमाणे सूर्याची लाल काेर दिसत हाेती. सायंकाळी ५.३९ वाजता सूर्य ग्रहणातच मावळतीला गेला. डाेळ्याचे पारणे फेडणारा हा क्षण ५३ मिनिटे चालला. नागरिकांनी घरांच्या गच्चीवर आणि शक्य हाेईल तिथे ग्रहणाचा अनुभव घेतला. उघड्या डाेळ्यांनी किंवा साैर गाॅगलशिवाय इतर साहित्याने ग्रहण पाहू नये, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला हाेता. त्यानुसार नागरिकांनी काळजी घेतली.
रमण विज्ञान केंद्रात प्रचंड गर्दी
नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात ग्रहण पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली हाेती. केंद्रातर्फे दाेन टेलिस्काेप लावण्यात आले हाेते. शिवाय साैर गाॅगलचीही सुविधा केली हाेती. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी लाेकांमध्ये प्रचंड उत्सुकता हाेती. त्यामुळे चार वाजतापासून लाेकांची ताेबा गर्दी रमण विज्ञान केंद्रात जमली हाेती. शालेय विद्यार्थीच नाही तर प्राैढांसह ज्येष्ठ नागरिकांनी ग्रहण पाहण्यासाठी गर्दी केली हाेती. बहुतेक पालक मुलांना घेऊन पाेहाेचले हाेते. केंद्राचे खगाेल शिक्षण महेंद्र वाघ, अभिमन्यू भेलावे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. ग्रहण संपल्यानंतर नागरिकांना टेलिस्काेपने गुरू आणि शनिचेही दर्शन घडविण्यात आले.