शिवराय व जिजाऊच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:46 PM2018-06-25T23:46:34+5:302018-06-25T23:51:13+5:30
‘आऊसाहेब,रयतेने केवळ तुमच्यातील प्रेमळपणा अनुभवला. पण तुमच्यातील वाघिण पाहण्याचे भाग्य आम्हालाच लाभले...’ शिवरायांच्या मुखातील हे वाक्य जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणारे आहे. छत्रपती शिवराय म्हणजे योद्धा, पराक्रमी पुरुष आणि कुणासाठी ते हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे ईश्वरी अवतार वाटतात. त्यांची आई जिजाऊ यांच्याबाबतही हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र नियतीने घडविलेल्या पराक्रमी पुरुषातील एक माणूस आणि स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्यातील आई-मुलाचे नाते याचा मार्मिक उलगडा करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘राजे हाच खरा श्रींचा आशीर्वाद’ हे नाटक.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘आऊसाहेब,रयतेने केवळ तुमच्यातील प्रेमळपणा अनुभवला. पण तुमच्यातील वाघिण पाहण्याचे भाग्य आम्हालाच लाभले...’ शिवरायांच्या मुखातील हे वाक्य जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणारे आहे. छत्रपती शिवराय म्हणजे योद्धा, पराक्रमी पुरुष आणि कुणासाठी ते हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे ईश्वरी अवतार वाटतात. त्यांची आई जिजाऊ यांच्याबाबतही हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र नियतीने घडविलेल्या पराक्रमी पुरुषातील एक माणूस आणि स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्यातील आई-मुलाचे नाते याचा मार्मिक उलगडा करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘राजे हाच खरा श्रींचा आशीर्वाद’ हे नाटक.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक उज्ज्वल ठेंगडी यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या नाटकाचा पहिलाच प्रयोग सोमवारी ओम नमो श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर सेवा मंडळाच्यावतीने साई सभागृह येथे सादर झाला. ठेंगडी यांचा शिवराय व जिजाऊंचे व्यक्तित्त्व शोधण्याचा प्रयत्न नवख्या कलावंतांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्याही मनाला भावला. सामान्य माणसाप्रमाणे घरातील एक प्रसंग घेऊन तमाम महाराष्ट्रला प्रेरणादायी असलेल्या या दोन व्यक्तींची भावनिकता मांडण्यात हे नाटक यशस्वी झाले. शिवराय हे सामान्य माणूस होते, पण सर्वधर्मीय मावळ्यांना घेऊन स्वराज्य उभं करण्याच्या कृतीमुळे ते सर्वव्यापी झाले. जिजाऊ यासुद्धा सामान्य
महिलांप्रमाणेच होत्या. पण सामान्य जनतेला प्रेमळ वाटणाºया या राजमातेच्या व्यक्तित्त्वात साम्राज्याची जाणीव आणि मुत्सद्दीपणा होता. असंख्य मावळ्यांचे समर्पण व सामान्य जनतेचा पाठिंबा शिवरायांना होताच, मात्र त्याहीपेक्षा राजकारणाची जाण असलेल्या खंबीर आईचा आधार त्यांना होता. नेहमी मोहिमेवर असलेल्या शिवरायांना राज्यातील शेतकºयांची, सामान्य माणसांची अवस्था अवगत करताना, राज्यातील शत्रू व निष्ठावंत कोण, याची जाण करून देताना त्याप्रमाणे कारभार करण्याची शिकवणही देणाऱ्या आई-मुलामधील संघर्षही त्यात होता. त्यांच्यातील भावनिक व राजकीय नात्यातील सामान्यपण नाटकातील प्रसंगातून, संवादातून लेखकाने मांडले.
पहिलाच प्रयोग असल्याने काही उतार-चढाव वगळता नाटक विचारशील असूनही कलावंतांनी अभिनयातून प्रेक्षकांना बांधून ठेवले. संदीप जोशी हे राजकारणातील अभ्यासू व्यक्तित्त्व. हा अभ्यासूपणा त्यांनी शिवरायांची भूमिका साकारताना अभिनयातून दाखवून दिला. जिजाऊंची भूमिका साकारण्याऱ्या दीपाली घोंगरे या जिजाऊंच्या व्यक्तित्त्वाचे पैलू उलगडण्यात यशस्वी ठरल्या. विशेष म्हणजे संपूर्ण नाटकभर ही दोन पात्रे मंचावर उपस्थित राहत असल्याने त्यांच्यावर भार अधिक होता व दोन्ही कलावंतांनी तो लीलया पेलला.
याशिवाय सोयराबाईच्या भूमिकेत पल्लवी उपदेव, बाळ संभाजीच्या भूमिकेत स्वरश्री उपदेव व इब्राहिमच्या भूमिकेत मोहन पात्रीकर आणि गौरी दीक्षित या कलावंतांनी त्यांच्या भूमिकांना जिवंत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मेकअप नकुल श्रीवास, प्रकाश मिथून दा, ध्वनी पवन बोरकुटे, छायांकन मंगेश राऊत व वेशभूषा नगरसेविका सोनाली कडू यांनी सांभाळली. प्रयोगाच्या वेळी आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, गिरीश गांधी, मंडळाचे अध्यक्ष वसंत भुसारी, भरत मेघे आदी मान्यवर उपस्थित होते.
संदीपला घेऊन चित्रपट बनविणार
संदीप जोशी यांच्या अभिनयाचे लेखक दिग्दर्शक उज्ज्वल ठेंगडी यांनी भरभरून कौतुक केले. वजीर या मराठी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन करणाऱ्या ठेंगडी यांनी सर्व शक्य झाल्यास संदीप व नाटकातील इतर कलावंतांना घेऊन या नाटकाच्या विषयावर चित्रपट बनविण्याची इच्छा व्यक्त केली.