नागपुरात वीज बिलावरून असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 09:54 PM2020-06-25T21:54:31+5:302020-06-25T21:56:04+5:30

तब्बल तीन महिन्यानंतर एकाच वेळी मिळालेल्या भरमसाट वीज बिलामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. तुळशीबाग येथील उपविभागीय कार्यालयात गुरुवारी लोकांची गर्दी हिंसक झाली.

Unrest on electricity bill in Nagpur | नागपुरात वीज बिलावरून असंतोष

नागपुरात वीज बिलावरून असंतोष

Next
ठळक मुद्देतुळशीबाग कार्यालयात तणाव :गार्डला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल तीन महिन्यानंतर एकाच वेळी मिळालेल्या भरमसाट वीजबिलामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. तुळशीबाग येथील उपविभागीय कार्यालयात गुरुवारी लोकांची गर्दी हिंसक झाली. भरमसाट बिलाबाबत तक्रार करण्यासाठी लोक आले होते. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु असंतुष्ट लोक हिंसेवर उतरले. महावितरणच्या गार्डला मारहाण करण्यात आली. इतर कर्मचाऱ्यांशीही असभ्य वर्तणूक केली गेली. याप्रकरणी महावितरणने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कोविड-१९ मुळे नागरिकांना मार्चनंतर विजेचे बिल आलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला मीटर रीडिंग घेऊन बिल पाठवले जात आहे. या बिलामुळे नागरिक चक्रावले आहेत. इतका विजेचा वापर झाल्याचे ते मान्य करायलाच तयार नाहीत. महावितरणच्या सर्वच कार्यालयात अशा लोकांची दररोज गर्दी होत आहे. टोकन देऊन त्यांना कार्यालयात सोडले जात आहे. महावितरणच्या तुळशीबाग येथील उपविभागीय कार्यालयात गुरुवारी सकाळी जवळपास दीडशेवर लोक आपली तक्रार घेऊन धडकले. फिजिकल डिस्टन्सिंगच्या चिंतेऐवजी त्यांना आपल्या विजेच्या बिलाचीच अधिक चिंता होती. कार्यालयातील लिपिक त्यांना बिलासंदर्भात समजावून सांगत होते. याचदरम्यान आनंदम फिडरमध्ये ब्रेकडाऊन झाल्याने ते दुरुस्त करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी रवाना झाले. दरम्यान, महाल येथील मनोज धोपटे हे सुद्धा आपले बिल घेऊन तिथे पोहोचले. लिपिक पूर्वेश ठाकरे यांनी त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अधिक बिल आल्याचा त्यांचा दावा होता. दुसरीकडे महावितरणचे म्हणणे आहे की, धोपटे बाहेर निघाल्यानंतर ते इतर लोकांना भडकवू लागले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसून आल्याने नागरिकांना टोकन वाटणारे गार्ड चंद्रशेखर बन्सोड यांनी धोपटे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान धोपटेने बन्सोड यांच्यावर हल्ला केला. तिथे पोहचलेले अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव यांच्याकडेही लोक धावून गेले. आरडाओरड ऐकून महावितरणचे इतर कर्मचारी बाहेर आले. लोकांनी त्यांच्याशी असभ्य वर्तणूक केली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रसन्न श्रीवास्तव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी धोपटेसह भोसेकरविरुद्ध ३५६,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

कार्यालयांच्या सुरक्षेत वाढ
महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता महावितरणच्या सर्व कार्यालयाची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्तांनाही देण्यात आली आहे. कंपनीचे अधिकारी शुक्रवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कार्यालयाच्या परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करणार आहेत. दोडके यांनी पुन्हा एकदा असा दावा केला की, तीन महिन्याचे बिल असल्याने स्वाभाविकपणे ते अधिक आहे. उन्हाळ्यात वाढलेला विजेचा वापर आणि १ एप्रिलपासून लागू करण्यात आलेले नवीन दर याचा परिणामही विजेच्या बिलावर पडला आहे. सध्या नागरिकांच्या सुविधेसाठी हप्त्यामध्ये वीज बिल भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

Web Title: Unrest on electricity bill in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.