विदर्भाला अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा; शेकडाे हेक्टर पिकांचे नुकसान

By निशांत वानखेडे | Published: March 18, 2023 08:48 PM2023-03-18T20:48:25+5:302023-03-18T20:49:05+5:30

Nagpur News मागील दाेन दिवसांपासून विदर्भाला अवकाळीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी व शनिवारी विविध जिल्ह्यांत झालेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे विद्यार्थिनीसह दाेघांचा बळी गेला तर शेकडाे हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.

Unseasonal rain and hailstorm in Vidarbha; Hundreds of hectares of crops were damaged | विदर्भाला अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा; शेकडाे हेक्टर पिकांचे नुकसान

विदर्भाला अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा; शेकडाे हेक्टर पिकांचे नुकसान

googlenewsNext

नागपूर : मागील दाेन दिवसांपासून विदर्भाला अवकाळीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी व शनिवारी विविध जिल्ह्यांत झालेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे विद्यार्थिनीसह दाेघांचा बळी गेला तर शेकडाे हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. वीज पडल्याने गडचिराेलीत विद्यार्थिनीचा तर अमरावतीत दाेन गायींचा मृत्यू झाला. यवतमाळात भिंत खचून एकाचा मृत्यू झाला. नागपूरसह गाेंदिया व भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

गडचिराेली जिल्ह्यात नवव्या वर्गातील स्विटी बंडू साेमनकर १६ वर्षीय विद्यार्थिनीचा वीज पडून मृत्यू झाला. चामाेर्थी तालुक्यातील मालेरचक गावातील स्विटी शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे जवळच्या कुनघडा या गावी शाळेत गेली हाेती. शाळा सुटल्यानंतर परतताना पाऊस सुरू झाला. वाटेतच तिच्या अंगावर वीज काेसळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले; पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्याच्या चांदुर रेल्वे तालुक्यात वीज पडल्याने दाेन गायी मृत्युमुखी पडल्या. दुसरीकडे यवतमाळच्या महागाव तालुक्यात हिवरा निवासी दीपक दगडू चवरे यांचा अंगावर घराची भिंत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील मानकापूर शिवारात वीज अंगावर कोसळल्याने चारजण जखमी झाले. दरम्यान, अमरावतीचे अचलपूर, यवतमाळ, गडचिराेली भागात अनेक घरांची पडझड झाल्याची माहिती आहे. बहुतेक जिल्ह्यात पावसापेक्षा वादळवाऱ्याने अधिक नुकसान केले आहे.

संत्रा, गहू, हरभरा पिकांना फटका

दरम्यान, अवकाळी पावसाने विविध जिल्ह्यांत शेकडाे हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात दाेन दिवस झालेल्या गारपिटीमुळे १०० हेक्टरमधील संत्रा, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले. वर्धा जिल्ह्यातही हरभरा, गहू, फरदड, कपाशीसह आंबा व संत्र्याचे माेठे नुकसान झाले. जिल्ह्यात १०८ हेक्टरमधील पिकांना फटका बसल्याची माहिती आहे. अकाेला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात ३७४ हेक्टर क्षेत्रांवर पिकांचे नुकसान झाले आहेत. वाशिम जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यात ३१३ हेक्टरमधील पिके नेस्तनाबूत झाली. शेतातील संत्रा, कांदा, मोसंबी, गहू, लिंबू, मूग, ज्वारी, हरभरा, टरबूज, खरबूज, पपई पिकांना फटका बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, सिंदखेड राजा तालुक्यातही पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. गडचिराेली जिल्ह्यात प्रमुख पिकांसह भाजीपालावर्गीय पिकांना नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यात कुही, उमरेड, भिवापूर आदी तालुक्यांत अवकाळी पावसाने पिकांची माती झाल्याची माहिती आहे. भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली आणि लाखनी तालुक्यात फळबागा, भाजीपाला तसेच गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.

कुठे, किती पाऊस

शुक्रवारी रात्री गाेंदियात सर्वाधिक २२.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. गडचिराेलीमध्ये शनिवारी सकाळपासून पावसाने झाेडपले. जिल्ह्यात १२ तासात १५ मि.मी. पाऊस झाला. चंद्रपूरमध्ये शनिवारी दिवसभरात ९ मि.मी. पाऊस झाला. अकाेला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. नागपूरमध्ये कुहीसह काही तालुक्यांत सकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. भंडारा शहरात २०.३ मि.मी., तर विविध तालुक्यांतही गारपिटीसह जाेराचा पाऊस शनिवारी झाला.

चंद्रपूर जिल्ह्यात तीन तालुक्यांना तडाखा

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने बल्लारपूर, राजुरा व कोरपना तालुक्याला जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेकडो एकरांतील रब्बी पिकांचे नुकसान झाले. सिंदेवाही तालुक्यात वीज कोसळल्याने एक महिला जखमी झाली. बल्लारपूर तालुक्यातील गहू व हरभरा पिके जमीनदोस्त झाली. राजुरा तालुक्यातील १७ गावांतील कापूस, तूर, हरभरा, गहू व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. कोरपना तालुक्यातील अंतरगाव जि. प. प्राथमिक शाळेचे छत कोसळले. सुदैवाने घटनेच्या वेळी शाळेत विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली.

दिवसाच्या पाऱ्यात माेठी घसरण

दरम्यान, पावसाळी वातावरणामुळे बहुतेक जिल्ह्यात दिवसाच्या तापमानात माेठी घसरण झाली आहे. गाेंदियात १०.७ अंशांनी घसरून २६ अंशांची नाेंद करण्यात आली. नागपूर व चंद्रपुरात नऊ अंशांची घसरण हाेऊन कमाल तापमान २८ अंशांवर खाली आले. अकाेलामध्ये ६.७ अंश, अमरावतीत ७.६ अंश, वर्ध्यात ६.४, तर यवतमाळात ७.१ अंश पारा घसरला. रात्रीचा पारा सरासरीच्या आसपास आहे.

Web Title: Unseasonal rain and hailstorm in Vidarbha; Hundreds of hectares of crops were damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती