पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2023 08:13 PM2023-03-08T20:13:38+5:302023-03-08T20:14:11+5:30

Nagpur News नागपूर जिल्ह्यात कुही, रामटेक, काटाेल, उमरेड, भिवापूर या तालुक्यात पाऊस कमी असला तरी वादळ वाऱ्याचा जाेर अधिक हाेता. वादळामुळे आंबा बहराचे माेठे नुकसान झाले.

Unseasonal rain hits West Vidarbha; Farmers in trouble | पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी संकटात

पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी संकटात

googlenewsNext
ठळक मुद्दे फळबागांसह गहू, तूर, हरभरा पिकांचे नुकसान

नागपूर/ अकोला : नागपूर जिल्ह्यात कुही, रामटेक, काटाेल, उमरेड, भिवापूर या तालुक्यात पाऊस कमी असला तरी वादळ वाऱ्याचा जाेर अधिक हाेता. वादळामुळे आंबा बहराचे माेठे नुकसान झाले. सध्या शेतात हरभरा, गहू ही पिके कापणीला आली आहेत. वादळामुळे या पिकांनाही फटका बसला.

पश्चिम विदर्भात गत तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना फटका बसला आहे. अकाेला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांत गहू, तूर, हरभरा पिकांसह फळबागांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनाने दिले असले तरी अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात जवळपास ७०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, तुरीच्या पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. लोणार तालुक्यातील परडा दराडे येथील शाळेची भिंत कोसळून नुकसान झाले. तीन दिवसांत सरासरी ८ मिमी पावसाची नोंद झाली असून, बुलढाणा तालुक्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. नांदुरा व संग्रामपूर तालुक्यात नुकसानाची तीव्रता अधिक आहे.

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळ वाऱ्यामुळे फळबाग, गहू, हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील २०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. संत्रा, पपई, लिंबू, संत्रा यासह अन्य फळबागेचे नुकसान झाले तसेच आंब्याचा मोहरही गळून पडला.

अकाेला जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने ६ मार्चला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार अकाेट, तेल्हारा तालुक्यातील ११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे़. त्यामध्ये गहू, हरभरा, कांदा, आंबा व फळबाग पिकांना तडाखा बसला असून, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका, आगर, वाडेगाव येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

 

गहू आडवा, हरभऱ्याचे मातेरे, कांदा मातीमोल

अमरावती : रब्बीचे पीक काढणीला आले असताना जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसाने गहू जमिनीवर पडला. याशिवाय काढणीला आलेला व सवंगणी होऊन गंजी लावलेल्या हरभऱ्याचे मातेरे झाले आहे. काढलेल्या कांद्याला पाणी लागल्याने खराब होण्याची शक्यता आहे.

अमरावती जिल्ह्यात मंगळवारी सरासरी २.३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्याने काही भागांत गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश पाचही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

वर्धा जिल्ह्यात संत्राबागांना फटका

वर्धा : धुलिवंदनाच्या दिवशी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील संत्राबागांना मोठा फटका बसला. त्यासोबतच गहू आणि चण्यानेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.कारंजा आणि देवळी तालुक्यात ८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

Web Title: Unseasonal rain hits West Vidarbha; Farmers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती