विनातारण कर्ज योजना जाचक अटीत अडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:29 AM2020-11-22T09:29:12+5:302020-11-22T09:29:12+5:30
मनपाकडे नोंदणी नसल्यानेहीे अडचण : १४३५९ अर्जापैकी १९८३ हॉकर्सला लाभ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना टाळेबंदीनंतरच्या ...
मनपाकडे नोंदणी नसल्यानेहीे अडचण : १४३५९ अर्जापैकी १९८३ हॉकर्सला लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना टाळेबंदीनंतरच्या मिशन बिगीनमध्ये देशभरातील फेरीवाल्यांना मदत म्हणून केंद्र सरकारने विनातारण १० हजार रुपयांची कर्ज योजना सुरू केली. यासाठी फेरीवाल्यांनी नागपूर महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडे १४ हजार ३५९ ऑनलाईन अर्ज केले. आजवर यातील १९८३ अर्जधारकांनाच कर्ज वाटप केले आहे. कर्ज मंजुरीसाठी असलेल्या बँकांच्या जाचक अटीत ही योजना अडकली आहे.
राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांकडून या योजनेंतर्गत विनातारण कर्ज देण्यात येते. केंद्र सरकारनेच त्यांना तसे आदेश दिले आहेत. नागपूर मनपाच्या समाजकल्याण विभागाकडे १४ हजार ३५९ फेरीवाल्यांनी ऑनलाईन अर्ज केले. यातील ४ हजार ४९६ अर्ज मंजूर करण्यात आले तर १ हजार ९८३ फेरीवाल्यांना या योजनेचा लाभ मिळाला. बँकांच्या जाचक अडचणी असून अर्ज करूनही बँकाकडून मंजुरी मिळत नसल्याने फेरीवाल्यांच्या नशिबी निराशाच येत आहे.
नागपूर शहरात ६५ हजाराहून अधिक फेरीववाले आहेत. नोंदणी झालेले मात्र ३४ हजार आहेत. नागपूर जिल्हातील नगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांची तर नोंदीच केलेल्या नाहीत. अर्ज करूनही कर्ज मिळण्याची शाश्वती नसल्याने बहुसंखय फेरीवाल्यांनी अर्जच केले नाही.
...
पात्रतेसाठी नोंदणी आवश्यक
या योजनेत पात्र होण्यासाठी नोंदणी झालेले असणे आवश्यक आहे. त्यांनी अर्ज ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे. मनपाने दिलेला नोंदणी क्रमांक टाकावा लागतो. तो टाकल्याशिवाय अर्ज सबमिट होत नाही. अनेकांकडे नोंदणी क्रमांक नसल्याने अडचण झाली आहे.
...
मोजक्याच फेरीवाल्यांना लाभ
बँका क्षुल्लक त्रुटीमुळे अर्ज नाकारात आहे. बँकाच्या जाचक अटी, त्यात वारंवार होणारी अतिक्रमणविरोधी कारवाई यामुळे निरीक्षणासाठी आलेल्या बँक पथकाला दुकानाचे अस्तित्व सापडत नाही. यात अर्जदारांचा अर्जही रद्द करण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे मोजक्याच हॉकर्सला याचा लाभ मिळत आहे.
अब्दुल रज्जाक कुरेशी, अध्यक्ष फेरीवाला संघटना