नागपुरात ३१ऑगस्टपर्यंत दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 07:02 PM2019-08-22T19:02:39+5:302019-08-22T19:04:33+5:30
नागपूर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय जलप्रदाय समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्पात पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. याचा विचार करता नागपूर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय जलप्रदाय समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.
तोतलाडोह व नवेगाव खैरी प्रकल्पातील जलसाठ्यात होणारी वाढ विचारात घेऊ न पाणीकपात कायम ठेवायची की नाही याचा निर्णय ३१ ऑगस्टला घेतला जाईल, अशी माहिती जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील आठवड्यात चांगला पाऊ स झाला तरच धरणाची पातळी वाढेल; अन्यथा शहरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
२२ ऑगस्टपर्यंत पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेण्यात आला होता. प्रकल्पात आवश्यक जलसाठा झाला असता तर पाणीकपात बंद झाली असती. परंतु प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने, दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला.
चौराई धरणाचे दरवाजे बंद
मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पात ९३ टक्के जलसाठा झाला आहे. १५ ऑगस्टला पाणीपातळी वाढल्याने या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे तोतलाडोहाच्या जलसाठ्यात थोडी सुधारणा झाली. मात्र २२ ऑगस्टला या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. तोतलाडोहाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप चांगला पाऊ स झालेला नाही. नागपूर शहराचा पाणीपुरठा, वीज प्रकल्प, सिंचन व कळमेश्वरला पाणीपुरवठा करण्यासाठी या प्रकल्पात किमात ६०० दलघमी जलसाठा आवश्यक आहे. सध्या प्रकल्पात वापरता येईल असा ८२.३३ दलघमी जलसाठा आहे.