कोर्ट उठेपर्यंत शिक्षा
By admin | Published: February 16, 2017 02:24 AM2017-02-16T02:24:36+5:302017-02-16T02:24:36+5:30
दुखापत केल्याच्या प्रकरणात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. ए. तिवारी यांच्या न्यायालयाने एका आरोपीला न्यायालय उठेपर्यंत
नागपूर : दुखापत केल्याच्या प्रकरणात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. ए. तिवारी यांच्या न्यायालयाने एका आरोपीला न्यायालय उठेपर्यंत शिक्षा आणि तीन हजार रुपये दंड सुनावला. अतुल रमेश डोंगरवार (३२), असे आरोपीचे नाव असून तो गोपालनगर दुसरा बसस्टॉप येथील रहिवासी आहे.
प्रकरण असे की, ४ आॅक्टोबर २०१३ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास या प्रकरणातील फिर्यादी अतुल वामनराव कोठे (३०) रा. गोरले ले-आऊट हे आपल्या भावासोबत जेवण करीत बसले असता आरोपी अतुल डोंगरवार याने त्याच्या घराच्या समोर उभे राहून त्यांना शिवीगाळ केली होती. काही वेळानंतर अतुल कोठे यांनी डोंगरवार याच्या भाजीच्या ठेल्यावर जाऊन शिवीगाळ का केली, असे विचारताच आरोपीने लाकडी दांड्याने कोठे यांच्या डोक्यावर प्रहार करून जखमी केले होते. या प्रकरणी कोठे यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी भादंविच्या ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजता आरोपीला अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद जाफर शेख यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला न्यायालयाने न्यायालय उठेपर्यंत तसेच तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
न्यायालयात आरोपीच्यावतीने अॅड. एस. के. मोहिले आणि सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील वर्मा यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल संजय काळमेघ, नायक पोलीस शिपाई गजानन उईके यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)