गांधींकडे असेपर्यंत 'राम' आणि 'गाय' अहिंसक होते : चंद्रकांत वानखडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:24 PM2020-01-30T23:24:54+5:302020-01-30T23:25:42+5:30
गांधीजींकडे असेपर्यंत राम आणि गाय अहिंसक होती, मात्र संघाकडे जाताच ते हिंसक झाल्याची परखड टीका ज्येष्ठ विचारवंत व लेखक चंद्रकांत वानखडे यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधी राम मानतात, मंंदिर मानतात पण मंदिर बांधायला विरोध करतात. गांधींना हिंदू धर्म प्रिय होता पण जातीभेद, वर्णभेदाला ते धर्मावरचा कलंक मानत होते. गांधींनी सार्वजनिक व्यासपीठावरून अभिजनांची ही पारंपरिक चौकट मोडल्यानेच ते धर्मांधांचे लक्ष्य झाले. गांधीजींकडे असेपर्यंत राम आणि गाय अहिंसक होती, मात्र संघाकडे जाताच ते हिंसक झाल्याची परखड टीका ज्येष्ठ विचारवंत व लेखक चंद्रकांत वानखडे यांनी केली.
जनमंचच्या जनसंवाद कार्यक्रमात ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, नरेश क्षीरसागर उपस्थित होते. चंद्रकांत वानखडे यांनी अनेक दाखले समोर ठेवले. गांधीजींवर अनेक प्रकारची टीका केली गेली व चारित्र्यावर शिंतोडे उडविले गेले. त्यांच्यामुळे भारताचे तुकडे झाले, त्यांनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले ही कारणे देत त्यांच्या हत्येचे समर्थन करणारेही आहेत. मात्र १९३४ साली पहिल्यांदा गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न झाला होता व त्यात नारायण आपटे नामक आरोपीचे नाव समोर आले होते. त्यावेळी पाकिस्तान हा शब्दही कुणाला माहीत नव्हता. त्यामुळे हत्येच्या समर्थनात दिली जाणारी कारणे थोतांड असल्याचे जाणवते. या टोकाच्या गांधीद्वेषाचे कारण त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीतून सापडतात. देशात गांधींच्या उदयापूर्वी स्वातंत्र्याची चळवळ ही विशिष्ट वर्गापुरती मर्यादित होती. सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय स्वातंत्र्य या वादात सामाजिक सुधारणेचा विषय निषिद्ध होता. राजकीय सत्ता ही मक्तेदारी समजणाऱ्या धर्ममार्तंडांना त्यात बहुजनांचा सहभाग नको होता. गांधींच्या उदयानंतर पहिल्यांदा पारंपरिक चौकट मोडली गेली. राजकीय आंदोलनात सामाजिक सुधारणेला प्राधान्य मिळाले व जातीभेद, वर्णभेदाला तडा गेला. गांधींच्या स्वयंपाकगृहापर्यंत सर्व जातीधर्माच्या लोकांना परवानगी होती आणि धार्मिक सत्तेचा दावा करणारे या गोष्टीला ओंगळवाणा, घाणेरडेपणा मानत होते. त्यांच्या दृष्टीने हा घाणेरडेपणा गांधींच्या घरापर्यंत राहिला असता तर चालले असते, पण गांधींनी तो काँग्रेसच्या सार्वजनिक व्यासपीठावर आणला. सवर्णांच्या पारंपरिक चौकटीत असलेली चळवळ गांधी नेतृत्वामुळे सार्वजनिक झाल्याने संतापलेल्या अभिजनांनी स्वातंत्र्य लढ्याला ‘बाटलेले स्वातंत्र्य’ असा उल्लेख करीत त्यापासून फारकत घेतली व ब्रिटिशांशी जवळीक साधली. वर्णव्यवस्थेची चौकट भेदल्यामुळेच गांधीजींची हत्या झाली, असे परखड मत वानखडे यांनी व्यक्त केले.
१४७ देशात त्यांचे पुतळे आहेत, १६७ देशांनी त्यांची टपाल तिकिटे काढली आहेत. म्हणून ‘मजबुरी’चे नाही तर ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ अशी उक्ती प्रचारित होणे गरजेचे आहे. गोळ्या घातल्याने, चारित्र्यहनन, मूर्तिभंजन केल्यानेही गांधी मरत नाही, हे बघून आता कधी शहीद भगतसिंग तर कधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधीला मारण्याचा प्रयत्न केला जातो. पण जे आज भगतसिंंग, नेताजी यांचे नाव घेतात, ते कधी नेताजी किंवा भगतसिंगांसोबत जुळले होते का, असा सवाल वानखडे यांनी केला. मात्र सर्व पुरावे असताना गांधीप्रेमींनी ही टीका खोडली नाही.
यावेळी डॉ. शरद निंबाळकर यांनी, या देशात शेती, शेतकऱ्यांचे दु:ख, जातीभेद, असमानता, धर्मांधता आहे तोपर्यंत गांधी मरणार नाही, ते अजरामर राहतील, अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पांडे यांनी केले व संचालन डॉ. राजीव जगताप यांनी केले. नरेश क्षीरसागर यांनी आभार मानले.