Arvind Kejriwal: '...तोपर्यंत मला मृत्यू येऊ नये, मी देवाकडे मागतो ही मागणी’, अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं गुपित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 08:11 PM2022-05-08T20:11:21+5:302022-05-08T20:12:54+5:30
Arvind Kejriwal : केजरीवाल यांनी कुठल्याही पक्षासोबत किंवा आघाडीसोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच अरविंद केजरीवाल यांनी मंदिरात गेल्यावर देवाकडे केवळ दोन मागण्या मागतो, असं सांगत एक मोठं गुपित उघड केलं आहे.
नागपूर - दिल्ली आणि पंजाबमधील विजयांनंतर आता आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. दरम्यान, आज लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांनी कुठल्याही पक्षासोबत किंवा आघाडीसोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राजकारण आणि देशाच्या विकासाबाबतचं आपलंय व्हीजन स्पष्ट केलं. त्याबरोबरच अरविंद केजरीवाल यांनी मंदिरात गेल्यावर देवाकडे केवळ दोन मागण्या मागतो, असं सांगत एक मोठं गुपित उघड केलं आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, तुम्ही मंदिरात जाता का? मीसुद्धा मंदिरात जातो. तुमच्याप्रमाणे मीही देवाकडे मागणे मागतो. मी देवाकडे नेहमी दोन मागण्या मागतो. त्यातील पहिली म्हणजे देवा माझा भारत देश लवकरात लवकर जगातील एक नंबरचा देश बनू दे. तसेच त्यामध्ये माझा काही तरी हातभार लागू दे. दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत मी भारताला जगात एक नंबरचा देश झालेले पाहत नाही तोपर्यंत मला मृत्यू येऊ नये, असे गुपित अरविंद केजरीवाल यांनी उघड केले.
यावेळी २०२४ च्या रणनीतीबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले की, २०२४ ची निवडणूक हे आम आदमी पक्षाचं लक्ष्य नाही आहे. निवडणुका हे लक्ष्य नाही. तर आमचं लक्ष्य भारत आहे. भारत माता आहे. आम्ही आपलं करिअर सोडून भारतमातेसाठी आलो आहोत. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा ४९ दिवसांत मुख्यमंत्री सोडलं. जगात असं दुसरं उदाहरण नसेल. आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते पुढे म्हणाले की, केजरीवाल कुणासोबत नॅशनल अलायन्स करणार याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण मला ह्या १० पक्षांची आघाडी २० पक्षांची आघाडी करणार यामधील काही कळत नाही. मला कुणालाही हरवायचं नाही आहे. मला देशाला जिंकवायचं आहे. २०२४ मध्ये मी १३० कोटी जनतेची आघाडी उभी करणार आहे. मी देशातील डॉक्टर, सीए, पत्रकार, शेतकरी यांची आघाडी उभी करणार आहे. अशा १३० कोटी लोकांना पुढे न्यायचं आहे, असे सांगत केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.