धुक्यांमुळे पिकांवर ‘अवकाळी’ संकट; २० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2023 08:10 AM2023-01-06T08:10:00+5:302023-01-06T08:10:01+5:30
Nagpur News धुके, ढगाळ वातावरण, उतरलेला पारा आणि काही भागात काेसळलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे विदर्भातील सर्वच रब्बी पिकांसाेबत कपाशी, तुरी आणि भाजीपाल्याच्या पिकांचे १८ ते २० टक्के नुकसान हाेणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सुनील चरपे
नागपूर : धुके, ढगाळ वातावरण, उतरलेला पारा आणि काही भागात काेसळलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे विदर्भातील सर्वच रब्बी पिकांसाेबत कपाशी, तुरी आणि भाजीपाल्याच्या पिकांचे १८ ते २० टक्के नुकसान हाेणार असल्याचा प्राथमिक अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. किडींचा प्रादुर्भाव व जमिनीचे तापमान कमी हाेऊन पिकांमध्ये आंतरिक बदल हाेत असल्याने नुकसान हाेते, असेही त्यांनी सांगितले.
धुके व थंडीची तीव्रता विदर्भात सर्वाधिक असून, तुलनेत मराठवाडा, खानदेश, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात कमी असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या वातावरणाचा गहू, हरभरा, मका, वाटाणा यासह इतर रब्बी तर कपाशी, तूर या खरीप व भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान हाेत आहे. अमरावती जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी काेसळल्या असून, नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यातील काही भागात कडाक्याच्या थंडीमुळे तूर व कपाशीची पिके वाळली आहेत.
धुक्यामुळे पिकांवर किडींसाेबतच बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट हाेणार असल्याने शेतकऱ्यांनी याेग्य उपाययाेजना करायला हव्या, अशी माहिती डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.
राेग व किडींचा प्रादुर्भाव
धुक्यामुळे तुरीवर शेंगा पाेखरणाऱ्या तर हरभऱ्यावर घाटेअळीचा तसेच गव्हावर तांबेरा या बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव हाेताे. तुरी व हरभऱ्याचा फुलाेर गळताे. गव्हाची पाने पिवळी पडतात. माेसंबीचा अंबिया बहार गळत असून, आंब्याच्या बहारावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव हाेत असल्याने बहार गळताे. संत्र्याचा अंबिया बहार फुटीवर विपरित परिणाम हाेताे, अशी माहिती डाॅ. प्रदीप दवणे यांनी दिली.
शीतलहरमुळे पीक वाळली
नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील काही भागातील पिकांना शीतलहरीचाही फटका बसला आहे. त्यामुळे कपाशी व तुरीचे पीक वाळले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे जमिनीचे तापमान अचानक कमी हाेऊन पिकांमध्ये अचानक आंतरिक बदल हाेत असल्याने पिकांची वाढ खुंटल्यागत हाेते. त्यामुळे रब्बी पिके पूर्ण वाढ न हाेता अकाली वाळत असल्याने उत्पादनात घट हाेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेणार आहे.
विभागनिहाय पेरणीक्षेत्र
पिके - नागपूर - अमरावती
गहू - ९९,६८० - १,४०,५२२
हरभरा - २,२१,३५५ - ६,१६,२८८
मका - ५,७५२ - १२,०९४
कापूस - ६,४४,१६७ - १०,७५,९५४
तूर - १,७२,८३८ - ४,२२,८९५