‘सायकल फॉर नागपूर’ लोगोचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण; जागतिक सायकल दिनी मनपातर्फे सायकल रॅली
By गणेश हुड | Published: May 18, 2023 05:30 PM2023-05-18T17:30:51+5:302023-05-18T17:31:25+5:30
Nagpur News ‘जागतिक सायकल दिना’च्या निमित्ताने ३ जून रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महापालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
गणेश हूड
नागपूर : ‘जागतिक सायकल दिना’च्या निमित्ताने ३ जून रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महापालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने गुरूवारी मनपा आयुक्त धाकृष्णन बी. यांनी सायकल रॅलीच्या ‘सायकल फॉर नागपूर’ लोगोचे अनावरण केले.
यावेळी मनपा आयुक्तांनी सायकल रॅलीच्या आयोजनासंदर्भात चर्चा करून सूचना मांडल्या.३ जून रोजी सकाळी ६ वाजता सिव्हिल लाईन्स येथील महापालिका मुख्यालय, येथून १६ किमीच्या रॅलीला शुभारंभ होईल. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करणे अनिवार्य आहे. मनपाच्या अधिकृत www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील ‘World Bicycle Day Rally Registration Form’ यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून नि:शुल्क नोंदणी करता येईल. इच्छूकांनी ३१ मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. सायकल रॅलीमध्ये शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, सायकलप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
यावेळी उपायुक्त सुरेश बागडे, शहराचे बायसिकल मेअर डॉ. अमित समर्थ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, मनपा शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक शिक्षणाधिकारी सुशील बन्सोड, डॉ. पद्माकर चारमोडे, अशफाक शेख, नागपूर एनसीसी ग्रुपचे कैलाश पटले, एनडीएएचे गणेश वाणी, प्रदीप देशपांडे, जयंत मेंढी, अंकीत शेगावकर, दिलीप वाकड आदी उपस्थित होते.