बाबासाहेबांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण
By admin | Published: February 5, 2016 02:43 AM2016-02-05T02:43:23+5:302016-02-05T02:43:23+5:30
तब्बल १२ वर्षांपासून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त साधण्यात जिल्हा परिषदेला अखेर यश आले आहे.
प्रतीक्षा संपली : मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती
नागपूर : तब्बल १२ वर्षांपासून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त साधण्यात जिल्हा परिषदेला अखेर यश आले आहे. उद्या, शनिवारी, ६ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
जिल्हा परिषदेने तत्कालीन अध्यक्ष रमेश मानकर यांच्या कार्यकाळात सर्वसाधारण सभेत बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, प्रशासनाला बांधकाम, पर्यावरणासह इतर विविध विभागाच्या १६ परवानगी मिळविण्यासाठी तब्बल १२ वर्षे लागली. त्याचप्रमाणे सत्तापक्षाचे दुर्लक्ष व प्रशासनाचा गलथान कारभारही यासाठी कारणीभूत ठरला. त्यानंतर समाज कल्याण सभापती दीपक गेडाम यांनी पुतळा उभारण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांना विश्वासात घेऊन पाठपुरावा सुरू केला. पुतळा उभारण्यासाठी जि.प. सदस्य सुरेंद्र शेंडे यांनीही उपोषणाचा इशारा देऊन शासन, प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्वांच्याच प्रयत्नाने हा पुतळा १३ आॅक्टोबर २०१५ रोजी जि.प. नवीन प्रशासकीय इमारतीसमोर बसविण्यात आला. संविधान दिनी २६ नोव्हेंबरला या पुतळ्याचे लोकार्पण होणार होते. मात्र, विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशनाच्या धावपळीमुळे अनावरणाचा मुहूर्त लांबनीवर पडला. अखेर ६ फेबु्रवारीला पुतळ्याचे अधिकृत अनावरण केले जाणार आहे. यावेळी पालकमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)