९१ व्या नाट्य संमेलनाच्या प्रतीक चिन्हाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:46 AM2019-01-29T11:46:26+5:302019-01-29T11:47:11+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित ९१ व्या नाट्य संमेलनाचे २२ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या प्रतीक चिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित ९१ व्या नाट्य संमेलनाचे २२ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या प्रतीक चिन्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते व स्वागत समिती संयोजक संदीप जोशी, प्रमुख निमंत्रक प्रफुल्ल फरकसे, स्वागत समितीचे सरचिटणीस किशोर आयलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
१९८५ साली नागपुरात नाट्य संमेलनाचे आयोजन झाले होते. त्यानंतर ३४ वर्षांनी परत येथे संमेलन होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत तर ज्येष्ठ नाट्य लेखक प्रेमानंद गज्वी हे संमेलनाध्यक्ष राहणार आहेत. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते नाट्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. नाट्य संमेलनासाठी नाट्य परिषदेने रेशीमबाग परिसरात नवीन कार्यालय सुरू केले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ३१ जानेवारी रोजी याचे उद्घाटन होणार आहे. यानंतर नागपूर व विदर्भातील विविध सहयोगी संस्था तसेच आयोजनात प्रत्यक्ष सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रंगकर्मींची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.