उलगडला संघप्रवेश ते पंतप्रधानपदापर्यंतचा 'अटल प्रवास'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:24 PM2019-12-24T23:24:24+5:302019-12-24T23:29:56+5:30
देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा विरोधकांना देखील भुरळ पाडणारी होती. नेता, कवि आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामान्य स्वयंसेवक व प्रचारक अशा विविधांगी भूमिकांतून त्यांचे कार्य जगतापुढे आहे.हाच ‘अटल प्रवास’ दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या रंगमंचावर ‘अटल यात्रा’ या हिंदी महानाट्याद्वारे मंगळवारी सादर झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा विरोधकांना देखील भुरळ पाडणारी होती. एक द्रष्टा विचारक, हिंदुत्वाची स्पष्ट परिभाषा व्यक्त करणारा नेता, कवि आणि एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामान्य स्वयंसेवक व प्रचारक अशा विविधांगी भूमिकांतून त्यांचे कार्य जगतापुढे आहे. हाच ‘अटल प्रवास’ दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या रंगमंचावर ‘अटल यात्रा’ या हिंदी महानाट्याद्वारे मंगळवारी सादर झाला.
दमक्षे सांस्कृतिक केंद्र व प्रयास बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने रंजना चितळे लिखित व प्रियंका ठाकूर दिग्दर्शित हे नाटक मंगळवारी सादर झाले. उद्घाटन महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, दमक्षेचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, आ. अनिल सोले, नगरसेविका प्रगती पाटील, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक संजय बंगाले, नगरसेवक अजय बागडे, दमक्षेचे कार्यक्रम अधिकारी शशांक दंडे, दीपक पाटील, प्रयास संस्थेचे अध्यक्ष शक्ती ठाकूर उपस्थित होते.
३०० हून अधिक कलावंतांच्या सहभागाने सादर झालेल्या या नाटकातअटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मापासून ते पंतप्रधानपदार्यंत पोहोचलेला प्रवास, अणुबॉम्बचे पोखरण येथे केलेले परीक्षण, कारगील युद्ध आदी घटना रेखाटण्यात आल्या. नाटकात अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका विनोद राऊत, गोळवलकर गुरुजी यांची भूमिका अनिल पालकर, नानाजी देशमुख यांची भूमिका मुकुंद वसुले, नितीन गडकरी यांच्या भूमिका विष्णू श्रीवास्तव, दीनदयाल उपाध्याय यांची भूमिका नचिकेत म्हैसाळकर, युवा देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अंश रंधे, राजनाथ सिंह शक्ती रतन, इंदिरा गांधी हर्षाली कायलकर, लालकृष्ण अडवाणी नागेश विध्वंस यांनी साकारल्या.