‘यूपी गँग’ने ‘यूट्यूब’वरून घेतले चोरीचे धडे; सहा राज्यांसह नागपुरात ३३ एटीएम फोडून डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 05:41 PM2022-10-01T17:41:34+5:302022-10-01T17:44:33+5:30

ही टोळी विविध राज्यांत जाऊन तेथील एटीएममध्ये चोरी करायची.

'UP Gang' learned stealing lessons from 'YouTube'; 33 ATMs were broken in Nagpur along with six states | ‘यूपी गँग’ने ‘यूट्यूब’वरून घेतले चोरीचे धडे; सहा राज्यांसह नागपुरात ३३ एटीएम फोडून डल्ला

‘यूपी गँग’ने ‘यूट्यूब’वरून घेतले चोरीचे धडे; सहा राज्यांसह नागपुरात ३३ एटीएम फोडून डल्ला

googlenewsNext

नागपूर : सहा राज्यांसह नागपुरात ३३ एटीएममध्येचोरी करणाऱ्या ‘यूपी गँग’चे सदस्य फारसे शिकलेले नसले तरी त्यांना पैसे कसे चोरायचे याचे तांत्रिक ज्ञान होते. ‘यूट्यूब’वरून या ‘गँग’ने चोरीचे धडे घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्क्रू ड्रायव्हर, पान्यांच्या साहाय्याने एटीएम मशीनच्या डिस्पेन्सरीमधून रक्कम चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या आंतरराज्यीय टोळीतील तीन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले. राहुल सरोज (वय २४, प्रतापगढ), संजयकुमार पाल (२३, प्रयागराज) व अशोक पाल (२६, प्रयागराज) यांना मागील आठवड्यात ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्यांनी सर्व चोरींची कबुली दिली. फेव्हिक्विक, लोखंडी पाना, स्क्रू-ड्रायव्हर यांच्या साहाय्याने ते चोरी करायचे. एटीएममधून नेमकी रक्कम कशी लंपास करायची याची कल्पना त्यांना ‘यूट्यूब’वरील व्हिडिओमधून आली होती. यासंदर्भात अनेक व्हिडिओ पाहिल्यावर त्यांनी चोरीची नेमकी ‘मोडस ऑपरेंडी’ ठरविली.

‘कॅश डिस्पेन्सर’वर चालायचा खेळ

या टोळीतील एक सदस्य बाहेर उभा राहून टेहळणी करायचा, तर दुसरा सदस्य आत जाऊन रोख रक्कम जेथून बाहेर येथे त्या ‘कॅश डिस्पेन्सर’मध्ये एक पातळ पट्टी लावायचे. यामुळे कॅशचा ट्रे वर येत नव्हता. कुणी पैसे काढण्याची प्रक्रिया केली तरी ग्राहकाला रोख रक्कम मिळत नव्हती. तांत्रिक गडबड समजून ग्राहक निघून जायचे. त्यानंतर टोळीतील सदस्य लगेच आत जाऊन पट्टी बाहेर काढायचे व रोख घेऊन पळ काढायचे. त्यांच्या टोळीतील विनोद सरोज (२५, प्रतापगड) व मोनू सरोज (२२, प्रतापगड) हे फरार आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक पोलीस आयुक्त संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, विनायक कोल्हे, संदीप बागुल, संजय शाहू, सुनील कुसराम, संदीप गवळी, संदीप पाटील, वैभव कुरसंगे, कृणाल कोरचे, महेंद्र सेलूकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अनेक राज्यांत चोरी

ही टोळी विविध राज्यांत जाऊन तेथील एटीएममध्ये चोरी करायची. महाराष्ट्रासह, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशातदेखील त्यांनी एटीएममधून रक्कम काढली. त्यांनी ही प्रणाली नेमकी कुठून शिकली, तसेच चोरीचा पैसा कुठे ठेवला आहे, याबाबत चौकशी सुरू आहे.

Web Title: 'UP Gang' learned stealing lessons from 'YouTube'; 33 ATMs were broken in Nagpur along with six states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.