कळमन्यात एक लाख पोत्यांपर्यंत लाल मिरचीची आवक !

By मोरेश्वर मानापुरे | Published: February 20, 2024 07:54 PM2024-02-20T19:54:45+5:302024-02-20T19:55:19+5:30

सर्वाधिक सेस वसुलीनंतरही बाजारात पायाभूत सुविधांचा अभाव

Up to one lakh sacks of red pepper in Kalmana! | कळमन्यात एक लाख पोत्यांपर्यंत लाल मिरचीची आवक !

कळमन्यात एक लाख पोत्यांपर्यंत लाल मिरचीची आवक !

नागपूर: यावर्षी कळमना बाजारात लाल मिरचीची आवक वाढली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव उतरले आहेत. गत सोमवारी ९० हजार ते १ लाख पोते (प्रति पोते ४० ते ५० किलो) आणि या आठवड्यात सोमवारी ५० ते ६० हजार पोत्यांची आवक झाली. भाव प्रति किलो १३० ते २१० रुपयादरम्यान आहे. तेजा-४ ब्रॅण्ड १८० ते २१० रुपये किलो विकला जात आहे. पुढील आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता आहे.

कळमना मिरची बाजार असोसिएशनचे अध्यक्ष महेश बांते म्हणाले, कळमना मिरची बाजार आठवड्यात केवळ सोमवारी सुरू असतो. याच दिवशी लिलाव होतो. लिलावानंतर माल बाजारात ठेवला जातो. यावर्षी डिसेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण भीती दूर होऊन मालाची विक्रमी आवक आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव कमी झाले आहेत. मिरचीची मागणी देशविदेशात आहे. सध्या मांढळ, राजुरा, चंद्रपूर, कागजनगर, आरमोरी, भिवापूर, वणी, वरोरा, बुलढाणा, चिखली, सिरोंचा, वरूड, मोर्शी, तारसा, मौदा येथून मिरचीची आवक आहे. जानेवारीपासून सुरू झालेली आवक मे महिन्यापर्यंत राहील. 

यंदा मिरचीला जास्त मागणी
यावर्षी मिरचीचे उत्पादन वाढले असून आवक वाढली आहे. सोबतच अन्य देशांमधून मागणीत वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात सोमवारी आवक वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत भाव १० ते २० रुपये किलोने कमी आहेत.

सर्वाधिक सेस वसुली; मात्र रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांचा अभाव
महेश बांते म्हणाले, एमपीएमसीला कळमना मिरची बाजारातून सर्वाधिक सेसची वसुली करण्यात येते. पण सुविधांचा अभाव आहे. या बाजारलगतचा भाजी बाजार अन्य ठिकाणी नेण्याचे म्हटले जाते. पण त्यावर अंमलबजावणी होत नाही. अनेक वर्षांपासून समस्या सोडविल्या जात नाहीत. व्यापाऱ्यांकडे माल जास्त असल्याने ठेवण्यासाठी जागा नाही. गेल्यावर्षी या बाजारातील लाखो रुपयांची मिरची आगीत जळाली होती. वर्षानंतरही आग विझविण्याची सक्षम व्यवस्था अद्यापही उभारली नाही. केवळ निविदा काढण्याची माहिती आहे. शेतकऱ्यांसाठी बाथरूमची व्यवस्था नाही. भाजी बाजारात ट्रक रस्त्यावर उभे राहत असल्याने मिरची बाजारात पोहोचण्यात अडचणी येतात. अनेकदा ट्रक मिरची बाजारात पोहोचण्यासाठी रस्त्यातील अडथळे व्यापारी व शेतकऱ्यांना दूर करावे लागतात. पिण्याचे पाणी, शौचालय आणि पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या बाजाराकडे अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

चोरीचे प्रमाण वाढले
मिरची बाजारात मालाच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरीचे व्हिडिओ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दाखविल्यानंतरही कारवाई आणि उपाययोजना शून्य आहेत. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून त्यांची आंदोलनाची भूमिका आहे.

कळमना मिरची बाजारात किलो दर :
तेजा-४ १८०-२१०
मांढळ १४०-१५५
मांढळ तेजा १६०-१७५
बीडी १३०-१५०
५५३१ ब्रॅण्ड १३०-१५०
आरमोरी १४०-१५०
भिवापूर १६०-२००

Web Title: Up to one lakh sacks of red pepper in Kalmana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर